राज्य निवडणूक आयोगाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST2021-01-13T04:12:33+5:302021-01-13T04:12:33+5:30
राज्य निवडणूक आयोगाचा ‘जनाग्रह’ पुरस्काराने सन्मान लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय मतदार ...

राज्य निवडणूक आयोगाचा
राज्य निवडणूक आयोगाचा ‘जनाग्रह’ पुरस्काराने सन्मान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्य निवडणूक आयोगास ‘जनाग्रह सिटी गव्हर्नन्स ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. मंगळवारी यासंदर्भातील ऑनलाइन कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.
बंगळुरू येथील जनाग्रह सेंटर फॉर सिटिझनशीप अँड डेमोक्रसी या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट राज्य, महानगरपालिका, नागरी संस्था, राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोग अशा पाच गटांत राष्ट्रीय स्तरावर हे पुरस्कार देण्यात येतात. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्यासह विविध पक्षांचे आमदार, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, राजकीय-प्रशासकीय विषयातील तज्ज्ञ आदी आठ मान्यवरांच्या समितीने पुरस्कारार्थींची निवड केली. भारतीय प्रशासकीय सेवेत प्रदीर्घ आणि अतुलनीय कामगिरी केलेले व्ही. रामचंद्रन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे पुरस्कार दिले जातात.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. मतदार आणि उमेदवारांच्या लक्षणीय संख्येमुळे या निवडणुका आव्हानात्मक बनल्या आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन, हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. संगणकीय प्रणालीमुळे मनुष्यबळ आणि वेळेची बचत होते. शिवाय निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत झाली. त्यासाठी मिळालेला हा पुरस्कार आपल्या संपूर्ण राज्याचा गौरव आहे, अशी प्रतिक्रिया मदान यांनी दिली.
............................