Join us

आरोप बिनबुडाचे! 'फॅक्च्युअल' अहवाल दिल्लीला गेला; नवनीत राणांवर कारवाई होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 17:10 IST

नवनीत राणांच्या अडचणी संपता संपेनात! खोटे आरोप भोवण्याची शक्यता; कारवाईची टांगती तलवार

मुंबई: कोठडीत असताना पाणी देण्यात आलं नाही, वॉशरुम वापरू दिलं नाही, असे आरोप लोकसभेच्या खासदार नवनीत राणांनी केले होते. राणांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी राज्य सरकारला अहवाल देण्यास सांगितलं. त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी लोकसभा सचिवांना अहवाल पाठवला आहे. या अहवालामुळे राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मी दलित असल्यामुळे मला तुरुंगात पाणी देण्यात आलं नाही. मला वॉशरुमही वापरू दिलं गेलं नाही. दलित असल्यामुळे मला अपमानास्पद कोठडीत वागणूक देण्यात आली, असे गंभीर आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी केले होते. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं होतं. यानंतर लोकसभा सचिवांनी राज्य सरकारला अहवाल देण्यास सांगितलं होतं.

राज्याच्या मुख्य सचिवांनी लोकसभा सचिवांना अहवाल पाठवला आहे. राणांनी केलेले सर्व आरोप मुख्य सचिवांनी खोडून काढले आहेत. मुख्य सचिवांनी दिल्लीला पाठवलेल्या वस्तुस्थितीदर्शक अहवालामुळे राणांच्या अडचणी वाढू शकतात. राणांना तुरुंगात योग्य वागणूक देण्यात आली. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली नाही. त्यांनी पोलिसांवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी राणांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे राणांच्या अडचणी कायम आहेत. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा गेल्या आठवड्याभरापासून तुरुंगात आहेत. त्यांनी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. काल त्यावर सुनावणी झाली. मात्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला. उद्या सकाळी निकाल अपेक्षित आहे.

टॅग्स :नवनीत कौर राणा