चौपदरीकरणाऐवजी रुंदीकरणास सुरुवात
By Admin | Updated: May 13, 2015 23:46 IST2015-05-13T23:46:04+5:302015-05-13T23:46:04+5:30
मुंबई-पुणे या जुन्या राष्ट्रीय महामार्गाने माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी कर्जत-चौक रस्ता सोयीचा ठरतो. मुरबाड, नाशिककडे जाण्यासाठीही

चौपदरीकरणाऐवजी रुंदीकरणास सुरुवात
कर्जत : मुंबई-पुणे या जुन्या राष्ट्रीय महामार्गाने माथेरान या पर्यटनस्थळी जाण्यासाठी कर्जत-चौक रस्ता सोयीचा ठरतो. मुरबाड, नाशिककडे जाण्यासाठीही हा मार्ग जवळचा आहे. या ९ किमीच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम २०१२ मध्ये राज्य सरकारने मंजूर केले होते. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून हे चौपदरीकरण करण्यात येणार होते. मात्र आता केवळ रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा रस्ता चौपदरीकरण मंजूर असताना त्याचे केवळ रुंदीकरण करण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तसेच प्रवासीवर्गात नाराजी आहे.
या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक पुणे येथून जुन्या राष्ट्रीय महामार्गाने कर्जत फाटा येथून वळवून ती कल्याणमार्गे पुढे मार्गस्थ करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी कर्जत-चौक, खोपोली हाळ फाट्यापासून कल्याणपर्यंतचा रस्ता चौपदरीकरणाचे धोरण राज्य सरकारने जाहीर केले होते. कल्याण भागातील रस्त्याच्या चौपदरीकरणाची कामे सुरू झाले असून दोन-अडीच वर्षांत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पण कर्जत- चौक हा नऊ किलोमीटरचा रस्ता आॅक्टोबर २०१४ पर्यंत अधांतरीच होता. कर्जत येथील चारफाटा येथून सुरू होणारा हा रस्ता २०१२ मध्ये सर्वेक्षण होत असताना १५ मीटर रुंदीकरणासाठी रस्त्यांची मोजमापे घेतली गेली.
राज्यमार्ग दर्जाच्या रस्त्यावरील वळणेही कमी करण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण प्रयत्नशील आहे. (वार्ताहर)