धान्य उचलण्यास सुरूवात
By Admin | Updated: November 17, 2014 00:43 IST2014-11-17T00:43:51+5:302014-11-17T00:43:51+5:30
खोट्या तक्रारीवरुन झालेल्या कारवाईविरोधात धान्य उचलण्यास नकार देणा-या पनवेल आणि परिसरातील शेकोडो रास्त भाव दुकान मालकांनी अखेर धान्य उचलण्यास सुरूवात केली

धान्य उचलण्यास सुरूवात
नवी मुंबई : खोट्या तक्रारीवरुन झालेल्या कारवाईविरोधात धान्य उचलण्यास नकार देणा-या पनवेल आणि परिसरातील शेकोडो रास्त भाव दुकान मालकांनी अखेर धान्य उचलण्यास सुरूवात केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शासकीय गोदामांमध्ये पडून असलेले धान्य गरिबांना उपलब्ध होणार आहे.
राज्य भरारी पथकाने खोट्या तक्रारींच्या आधारे केलेल्या कारवाईविरोधात दुकान मालकांनी धान्य न उचलण्याचा पवित्रा घेतला होता. यामुळे शासकीय गोदामात जवळपास २० हजार क्विंटल धान्य पडून होते. दरम्यान अनेक दिवसांपासून धान्य एकाच ठिकाणी पडून असल्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रकरणी तहसिलदारांबरोबर झालेल्या बैठकीनंतर दुकानदारांनी धान्य उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती पुरवठा निरिक्षक अधिकारी शशिकांत वाघमारे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजने अंतर्गत तालुक्यातील ६० हजार पेक्षा जास्त लाभार्थींना लाभ होत आहे. तालुक्यातील १८६ दुकानदारांकडून एपीएल, बीपीएल कार्ड धारकांना त्याचा धान्य मिळते. मात्र पनवेलमधील अजय देशमुख या बनावट नावाने आलेल्या तक्रारीवर सात रास्त भाव दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याच्या निषेधार्थ पनवेल रास्त भाव संघटनेने धान्य न उचलण्याचा निर्णय घेतला होता.(प्रतिनिधी)