Join us  

येत्या जूनपासून 13 तर पुढील वर्षापासून 100 शाळा सुरू करणार - शिक्षणमंत्री विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 8:32 PM

जून महिन्यापासून राज्यातील 13 तर पुढील शैक्षणिक वर्षापासून 100 आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : जून 2018 या नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सरकारी शाळातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ‘ओजस आंतरराष्ट्रीय शाळांची’ सुरुवात करण्यात येणार असून, जून महिन्यापासून राज्यातील 13 तर पुढील शैक्षणिक वर्षापासून 100 आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.राज्यातील विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग,शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस शिक्षणमंत्री तावडे यांच्यासह प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त डॉ. विशाल सोळंकी, सोनम वांछू, स्वरुप संपत, शेरिन मिस्त्री उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या सिंगापूर, हॉंगकॉंग, जपान या देशातील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून आणि समृद्ध आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम व प्रभावी अध्ययन संसाधने यांची उपलब्धता सुनिश्चित करूनहा महत्त्वकांक्षी निर्णय घेण्यात आलेला आहे. १४ जुलै २०१७ च्या शासन निर्णयानुसार पहिल्या टप्प्यातील 13 ‘ओजस’ शाळांची निवड झालेली असून या शाळा मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी तयार होतील. या शाळांमधील शिक्षकांना  पहिल्या टप्प्यात शासनाकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापुढील टप्प्यांमध्ये या शाळांच्या मार्गदर्शनाखाली नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू केल्या जातील,असेही श्री. तावडे यांनी सांगितले. प्रायोगिक पथदर्शी चाचणी घेऊन इयत्ता पहिली ते तिसरीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. टप्प्याटप्प्याने सर्व वर्गांचा अभ्यासक्रम तयार होत आहेत. या  शाळांच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र व स्वायत्त‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ’ तयार केले आहे. ज्ञानाधिष्ठित,  समाजाभिमुख,  एकविसाव्या शतकाकरिता कौशल्ये यांना केंद्रस्थानी ठेवून अभ्यासक्रम निर्मिती केली आहे.आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळांसाठी एक समिती गठित करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली आहे. Local to Global आणि Known to Unknown या ध्येयावर या शाळांचे काम सुरु राहणार आहे. एनसीईआरटी आणि एससीईआरटीच्या अभ्यासक्रमाचा विचार करुन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम प्रामुख्याने ज्ञान, अभिवृत्ती,  उपयोजना, कौशल्य आणि सवयी या 5 प्रमुख आधारस्तंभावर आधारित असणार आहे. या अभ्यासक्रमात साक्षरता, वाचन, लेखन,  संभाषण, श्रवण, गणन, वित्त,  कला,  शारीरिक शिक्षण आणि पर्यावरणशास्त्र या विषयांचा समावेश प्रस्तावित आहे.येत्या जून महिन्यापासून सुरु होणाऱ्या 13 शाळांसाठी 70 शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांना सलग 22 दिवसांचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे निवडण्यात आलेल्या 13 शाळा या जिल्हा परिषदेच्याच मराठी माध्यमांच्या शाळा असून मराठीबरोबरच इंग्रजी आणि अन्य विषयांचे प्रभुत्व वाढविण्यावर या शाळांमध्ये भर देण्यात येणार आहे. तोरणमाळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेच्या धर्तीवर प्रायोगिक तत्वावर शाळा सुरु करण्यात आली असून राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व देत अजून 12 ठिकाणी या शाळा सुरु होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळांमुळे या जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पहिली ते तिसरीचे वर्ग हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे होणार असल्याचेही तावडे यांनी सांगितले.

टॅग्स :विनोद तावडे