रेल्वे प्रवास सुरू, पण घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:23 IST2021-02-05T04:23:28+5:302021-02-05T04:23:28+5:30

लोकमत न्युज नेटवर्क मुंबई : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. रेल्वेसेवा सुरू झाल्यापासून ...

Start the train journey, but take care | रेल्वे प्रवास सुरू, पण घ्या काळजी

रेल्वे प्रवास सुरू, पण घ्या काळजी

लोकमत न्युज नेटवर्क

मुंबई : मार्चपासून सर्वसामान्यांसाठी बंद झालेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. रेल्वेसेवा सुरू झाल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत; दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ ते दिवसाच्या अखेरपर्यंत या तीन टप्प्यांत प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. सर्वसामान्य जनतेला सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते ९ या वेळेत प्रवास करण्याची परवानगी नाही. प्रवाशांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक असल्याने गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे.

सामान्य प्रवाशांची वेळ वगळून इतर काळात अत्यावश्यक सेवेतील कामगार आणि आरोग्यसेवा कर्मचारी, महिला प्रवासी आणि राज्य सरकारकडून विशेष पास असलेल्यांना प्रवास करण्याची परवानगी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य प्रवाशांसाठी मुंबई परिसरातील उपनगरीय रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. त्यांनतर ‘अनलॉक’ काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असल्याने रेल्वेस्थानकावर निवडक तिकीट खिडक्या सुरू होत्या. रेल्वे स्थानकांवरील एटीव्हीएम मशीन गेल्या १० महिन्यांपासून बंद होत्या. आता सोमवारपासून सर्वांसाठी उपनगरीय रेल्वे सुरू होत असल्याने सर्वच स्थानकांवर प्रवाशांची तिकिटांसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंद असलेल्या एटीव्हीएम मशीनचे दुरुस्ती आणि अद्ययावतीकरण करण्यात आले आहे, तसेच जेटीबीस सुविधा सुरू होणार आहे.

...अशी असेल व्यवस्था

१. कोरोना काळात बंद असलेली सर्व अधिकृत प्रवेशद्वारे, लिफ्ट, एक्सलेटर,पादचारी पूल यांचा वापर करता येईल.

२. सर्व तिकीटघर आणि एटीव्हीएम मशीन सुरू होणार.

३. गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा तैनात ठेवणार.

४. गर्दी नियंत्रणासाठी स्थानिक पोलिसांची मदत.

५. मास्क न घालणाऱ्यांवर पालिकेच्या मदतीने कारवाई.

६. ठरवून दिलेल्या वेळेतच प्रवास केला जातो का याची तपासणी.

७. एकूण रेल्वेगाड्यांपैकी ९५ टक्के गाड्या सुरू.

८. प्रवाशांचा संपर्क येणाऱ्या ठिकाणी सातत्याने निर्जंतुकीकरण.

९. कोरोनाबाबत नियमांचे पालन करण्यासाठी उद्घोषणा.

१०. कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी पोस्टर.

केबिन आणि आसनव्यवस्था स्वच्छ करण्यासाठी आम्ही पथके तयार केली आहेत. आम्ही वेळेत एन्ट्री आणि एक्झिट पॉइंट, तिकीट बुकिंग काउंटर वाढवणार आहोत. गर्दीचे नियमन करण्यासाठी रेल्वे पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांसह आमचे कर्मचारी उपलब्ध असतील. कोरोनाशी लढा देण्यासाठी आणि गाड्यांचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबईच्या सर्व लोकल प्रवाशांनी नियमांचे पालन करावे.

-सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Web Title: Start the train journey, but take care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.