Join us  

भाऊचा धक्का ते मांडवा  जलमार्गावर रो पॅक्स सेवा सुरु करा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 5:50 PM

ऑल इंडिया पॅसेन्जर्स असोसिएशनची मागणी

मुंबई : भाऊचा धक्क ते मांडवा  जलमार्गावर रो पॅक्स सेवा सुरु करावी अशी मागणी ऑल इंडिया पॅसेन्जर्स असोसिएशनने केली आहे.  राज्य व केंद्र शासनाच्या आर्थिक सहभागातून १३० कोटी रुपये खर्च करून रो पॅक्स सेवेचा प्रकल्प प्रत्यक्षात आला आहे.  मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कार्यक्षेत्रात भाऊचा धक्का येथे जुन्या मुघल लाईन जेट्टी जवळ यासाठी प्रशस्त पाणटून सहित जेट्टी उभारण्यात आली आहे.  तर मांडवा बंदर येथे पश्चिमेला ब्रेक वॅाटर सहित जेट्टी उभारली आहे व १५ मार्च ला या सेवेला प्रारंभ करण्यात आला. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात 23 मार्च पासून लॉकडाऊन करण्यात आल्याने रो पॅक्स सेवा सुरु होवू शकली नाही. 

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने मुंबई ते अलिबाग जाण्यासाठी नागरिकांवर अनेक बंधने आहेत. नागरिकांना अनेक तास प्रवास करुन शेकडो, हजारो रुपये खर्च करुन रस्ते मार्गाने अलिबाग गाठावे लागत आहे.  लॉकडाऊन असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळून नभाऊचा  धक्का ते मांडवा मार्गावर रो पॅक्स बोट सेवा लवकरात लवकर सुरु करावी अशी  मागणी ऑल इंडिया पॅसेन्जर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली आहे.  याबाबत त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांना लेखी पत्र पाठवून हजारो प्रवाशांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. 

जलमार्गाने     मुंबई ते अलिबाग थेट जोडणारा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.  या मार्गावर वाहतुकीसाठी आणलेली रो पॅक्स बोट सेवा परदेशी बनावटीची असून ती प्रवासी वाहतूक बरोबर वाहनांची वाहतूक करण्यासाठी उपयोगात येणार आहे.  ती मजबूत, प्रशस्त, व सुरक्षित आहे.  तिची प्रवासी क्षमता 500 व वाहनांची क्षमता 200 ची आहे. सध्याच्या परीस्थितीत प्रवासी संख्या व वाहन संख्या कमी करून ही वाहतूक सुलभ व फायदेशीर होऊ शकेल. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड हे तालुके पर्यटन क्षेत्र म्हणून देशाच्या नकाशावर प्रसिद्धीला आले आहेत.  त्यामुळे पर्यटक प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता तसेच या मार्गावर सध्या कोणतीही सार्वजनिक वाहतूक सेवा नसल्याने शेकडो प्रवाशांची गरज ओळखून चांगल्या हवामानाची खात्री करून रो पॅक्स सेवा सुरु करावी असे मोकल यांनी निवेदनात म्हटले आहे.  या सेवेमुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट व महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाला प्रवासी लेव्ही व जेट्टी भाडे या माध्यमाने आर्थिक उत्पन्न मिळेल.

टॅग्स :जलवाहतूकमुंबईपाणी