मुंबई मॅरेथॉनसाठी नोंदणी सुरु
By Admin | Updated: July 20, 2016 21:38 IST2016-07-20T21:38:50+5:302016-07-20T21:38:50+5:30
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेली आणि जगभरातील धावपटूंना आकर्षित करणारी मुंबई मॅरेथॉन १५ जानेवारी २०१७ रोजी रंगणार आहे. १४ वे वर्ष असलेल्या या मॅरेथॉनसाठी

मुंबई मॅरेथॉनसाठी नोंदणी सुरु
स्पर्धेचे १४ वे सत्र : राज्यपालांनी केली घोषणा
मुंबई : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेली आणि जगभरातील धावपटूंना आकर्षित करणारी मुंबई मॅरेथॉन १५ जानेवारी २०१७ रोजी रंगणार आहे. १४ वे वर्ष असलेल्या या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु झाल्याची घोषणा महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी राजभवनमध्ये केली. यावेळी स्पर्धेचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर अभिनेता जॉन अब्राहमही उपस्थित होता.
मुंबई मॅरेथॉनची संपूर्ण नोंदणी आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. ४२ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनसाठी ५ हजार प्रवेशिका उपलब्ध असून २१ किमीच्या अर्ध मॅरेथॉनसाठी १५ हजार प्रवेशिका उपलब्ध आहेत. तसेच सर्वाधिक आकर्षणाचा केंद्र असलेल्या ड्रीम रनसाठी २० हजार २०० प्रवेशिका उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे वरिष्ठ नागरिकांसाठी १२०० आणि चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटीसाठी ३०० प्रवेशिका असतील. या सर्व गटांतील मॅरेथॉनपटूंची संख्या ४१ हजार ७०० अशी असल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली.
आॅनलाईन नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. त्याचबरोबर पी.ओ.बॉक्स क्र. ११०१७, मरीन लाईन्स पोस्ट आॅफिस, मुंबई -४०००२० या पत्त्यावर नोंदणीशुल्कासह अर्ज पाठवावे, अशी माहिती आयोजकांनी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
सुदृढ आरोग्यासाठी मॅरेथॉनमध्ये धावा- जॉन
गेली अनेक वर्ष मी या स्पर्धेबरोबर आहे. सर्व स्तरावरील लोकांना एकत्र आणून उत्साह निर्माण करणारी स्पर्धा म्हणून मुंबई मॅरेथॉनचा लौकिक आहे. या मॅरेथॉनचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे. सुदृढ आरोग्यासाठी सर्वांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आपले योगदान द्या.
- पूर्ण मॅरेथॉन नोंदणी प्रक्रिया २५ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. पूर्ण मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख १७ सप्टेंबर असून आवश्यक प्रवेशिकांची याआधीच नोंदणी झाल्यास पुढील नोंदणी प्रक्रीया त्वरीत बंद करण्यात येईल.
- अर्ध मॅरेथॉनसाठीची नोंदणी २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुरु होणार असून अंतिम दिनांक शुक्रवार २६ आॅगस्ट आहे.
- ड्रीम रनसाठी नोंदणी सोमवारी २९ आॅगस्टला सकाळी १० वाजता सुरु होणार असून शेवटची तारीख बुधवार ३१ आॅगस्ट आहे.
- सिनियर सिटीझन रन व चॅम्पियन विथ डिसेबिलिटी गटातील धावपटूंना गुरुवार १ सप्टेंबर पासून नावे नोंदविता येणार असून १७ सप्टेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रीया सुरु राहिल.