Join us
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्क, लंडनप्रमाणे महानगरपालिकेच्या सर्व बैठकांचे थेट प्रसारण करणे सुरू करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 12:27 IST

गोवंडी सिटिझन्स वेल्फेअर फोरमची मागणी; पारदर्शक प्रशासनासाठी पाठपुरावा करण्याचे राजकीय पक्षांना आवाहन

मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी लवकरच जाहीर होणार असून, त्यानंतर इतर प्रशासकीय प्रक्रियेला वेग येईल. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या मागण्या, अपेक्षा आणि जाहीरनामे राजकीय पक्षांपुढे ठेवण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून न्यूयॉर्क, लंडनप्रमाणे आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या सर्व समित्यांच्या, विविध बैठकांचे थेट प्रसारण करण्याची मागणी गोवंडी सिटिझन्स वेल्फेअर फोरमने केली आहे.

परदेशातील अनेक महानगरांमध्ये महापालिकांमध्ये नागरी सुविधांबाबत घेण्यात येणाऱ्या बैठकांचे थेट प्रसारण केले जाते, असे फोरमने म्हटले आहे. त्यानुसार सर्व राजकीय पक्षांनीही या मागणीसाठी आग्रह धरावा, असे त्यांना फोरमकडून पाठवण्यात आले आहे.

साेयी-सुविधांबाबत निर्णय

मुंबई महानगरपालिका आशियातील सर्वांत मोठी महानगरपालिका असून, जवळपास सव्वा कोटी मुंबईकरांचे दैनंदिन जीवन प्रशासनावर अवलंबून आहे. मुंबईकरांच्या प्राथमिक सोयी-सुविधांसंबंधी महत्त्वाचे निर्णय पालिकेतील स्थायी समिती, शिक्षण समिती, सर्वसाधारण सभा, बेस्ट समिती, सार्वजनिक आरोग्य समिती,  सुधार समिती, आदींकडून घेतले जातात.

राजकीय पक्षांना पत्र

१८८८ च्या मुंबई महानगरपालिका कायद्यातील (एमसीजीएम ॲक्ट) कलम ६१ नुसार पालिका सार्वजनिक निधीचा वापर कसा करते, हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना असल्याचे राजकीय पक्षांना पाठवलेल्या पत्रात गोवंडी सिटिझन्स वेल्फेअर फोरमने म्हटले आहे.

कलम ८८ नुसार या बैठका खुल्या स्वरूपात होणे अपेक्षित आहे. मात्र, ते शक्य नसल्याने डिजिटल युगात त्याचे थेट प्रसारण शक्य असल्याचे फोरमने म्हटले आहे. कलम ९२ नुसार बैठकीतील निर्णय, ठराव आणि नोंदी अनिवार्य असतात.

भ्रष्टाचाराला आळा बसणार, चर्चेची गुणवत्ता सुधारणार

दिल्ली, पुणे, पिंपरी-चिंचवड, बंगळुरू येथे पालिकेच्या बैठकांचे थेट प्रसारण

केल्याची माहिती गोवंडी सिटिझन्स वेल्फेअर फोरमचे अध्यक्ष फैय्याज आलम शेख यांनी दिली. बैठकांच्या थेट प्रसारणामुळे लोकांना माहिती मिळेल. भ्रष्टाचारावर आळा बसेल, सभागृहातील चर्चेची गुणवत्ता सुधारेल, नगरसेवकांची जबाबदारी वाढेल आणि नागरिकांचा विश्वास दृढ होईल, असे मत शेख यांनी व्यक्त केले.

पालिकेकडे यासाठीचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. कर्मचारी, साधनसामग्री असल्यामुळे हे खर्चिक नाही, असेही त्यांनी नमूद केले. राजकीय पक्षांनी आपाल्या जाहीरनाम्यात त्याबाबत भूमिका स्पष्ट करावी आणि भविष्यातील महापौर आणि आयुक्त यांच्याशी समन्वय साधून त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा शेख यांनी व्यक्त केली.

‘सिटिझन्स वेल्फेअर’चा निवडणूक जाहीरनामा

व्हिडीओ सार्वजनिक करणे, थेट प्रसारणात अजेंडा, दस्तऐवज, वक्ते, उपस्थिती, मतदान निकाल दाखवणे, नगरसेवकांची वैयक्तिक उपस्थिती अनिवार्य, प्रतिनिधी पाठवण्यास बंदी, ठराव, मतदानाची माहिती वेबसाइट, यूट्यूब, केबलवर उपलब्ध करून देणे.

English
हिंदी सारांश
Web Title : Start Live Broadcasts of Municipal Meetings Like New York, London

Web Summary : Goa's Citizens Welfare Forum demands live broadcasts of Mumbai municipal meetings, mirroring practices in New York and London, to enhance transparency, curb corruption, and boost citizen engagement. They urge political parties to adopt this in their manifestos, leveraging existing technology.