Join us  

प्रवास सुखकर होणार! मेट्रो-३ साठी सरकते जिने बसविण्याच्या कामास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 4:27 PM

Mumbai Metro-3 : एम.आय.डी.सी. मेट्रो स्थानकापासून याचा प्रारंभ झालेला आहे. सरकत्या जिन्याचा नमूना संचाची (प्रोटोटाईप) सुरुवातीला चाचणी घेण्यात येईल.

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ भूमिगत मार्गावरील काम वेगाने सुरू असून आता मेट्रो स्थानकावर सरकते जिने (एक्सलेटर) बसविण्याच्या कामास सुरुवात झालेली आहे.

एम.आय.डी.सी. मेट्रो स्थानकापासून याचा प्रारंभ झालेला आहे. सरकत्या जिन्याचा नमूना संचाची (प्रोटोटाईप) सुरुवातीला चाचणी घेण्यात येईल. यानंतर सिद्धीविनायक स्टेशनवर देखील लवकरच हे काम हाती घेण्यात येईल. दोन्ही स्टेशन मिळून एकूण ४ नमूना संच (प्रोटोटाईप) बसविले जातील. या नमुना संचाच्या यशस्वी चाचणी नंतर इतर स्थानकावर देखील हे काम सुरू होईल.

मेट्रो -३ मार्गावरील सर्व स्थानकांवर एकूण ४१४ सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. त्यांचे उत्पादन आणि पुरवठा ''युआंडा रॉयल कॉन्सोर्शियम'' आणि ''एसजेईसी जॉन्सन कॉन्सोर्शियम'' द्वारे करण्यात येत आहे. 

‘ड्युएल स्पीड’ असलेल्या या मजबूत सरकत्या जिन्यानामध्ये पुनरुत्पादक ऊर्जा बचत यंत्रणा (Regenerative Energy Saving mode) आहे. यामुळे ऊर्जेची बचत होईल.

प्रवाशांना मेट्रो स्थानक परिसरातील प्रवेश/निकास द्वार ते तिकीट विभाग (कॉन्कोर्स) आणि तिकीट विभाग ते प्लॅटफॉर्म अशा दोन भागात जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या सरकत्या जिन्यांमुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

''एम.आय.डी.सी. स्थानकात लागणाऱ्या पहिल्या सरकत्या जिना म्हणजेच प्रोटोटाईप युनिटला बसविण्यास व कार्यान्वित होण्यासाठी सुमारे २०-२५ दिवस लागतील आणि त्यानंतर चाचणी घेण्यात येतील.'' अशी माहिती मुं.मे.रे.कॉ प्रवक्ता यांनी दिली.

 

टॅग्स :मुंबईमेट्रो