Join us
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस अखेर प्रारंभ , पहिली गुणवत्ता यादी ४ जुलैला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 07:25 IST

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर शनिवारपासून (२२ जूनपासून) सुरू झाली असून, अर्ज भरण्यासाठी बुधवारपर्यंत (२६ जून) मुदत देण्यात आली आहे.

मुंबई : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर शनिवारपासून (२२ जूनपासून) सुरू झाली असून, अर्ज भरण्यासाठी बुधवारपर्यंत (२६ जून) मुदत देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी ४ जुलै रोजी जाहीर होणार आहे.राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल जाहीर झाल्यापासून प्रतीक्षेत असलेल्या वैद्यकीय प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज भरणे, प्रवेश शुल्क भरणे यासाठी २६ जून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांची यादी २६ जून रोजी रात्री १० वाजता जाहीर करण्यात येईल. त्यानंतर, २९ जून ते ४ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम देता येतील. प्राथमिक गुणवत्ता यादी ४ जुलै सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल, तर पहिली प्रवेश यादी ५ जुलै रोजी रात्री ८ नंतर जाहीर करण्यात येईल. मिळालेल्या महाविद्यालयात १२ जुलै रोजी प्रवेश घ्यायचा आहे, तर १ आॅगस्टपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जागावैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यावरून वाद होता. राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या ९७० वाढीव जागांना अखेर मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मंजुरी दिली. यामुळे आता राज्यात एमबीबीएसच्या २,७६० वरून ३,७३० जागा झाल्या आहेत. या जागा नव्याने लागू होणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईडब्ल्यूएस) कोट्यांतर्गत वाढविल्या आहेत. मात्र, अद्यापही मराठा विद्यार्थ्यांसाठीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होण्याबाबत संभ्रम आहे. या जागा उपलब्ध व्हाव्यात, असा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे दिला आहे. मात्र, त्याबाबत केंद्राकडून अद्याप स्पष्टीकरण आलेले नाही.

टॅग्स :शिक्षण क्षेत्र