मुंबई - मुंबई-मडगाव या वंदे भारत एक्स्प्रेसला (२२२२९/२२२३०) प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ही गाडी १०० ते १०५ टक्के प्रवासी भारमानासह धावते. अनेकदा तिकिटासाठी प्रतीक्षा यादी असते. त्यामुळे २० डब्यांची ही गाडी असावी, अशी मागणी कोकण विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.
दुसरीकडे (२०६४५/२०६४६) मंगळुरू-मडगाव या ‘वंदे भारत’ला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे रेल्वेने आता मंगळुरू-मडगाव आणि मुंबई-मडगाव या ‘वंदे भारत’च्या एकत्रीकरणाची तयारी सुरू केली आहे. कर्नाटकमधील लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे याबाबत रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे यांच्यात बैठक होऊन वेळापत्रकावर चर्चा करण्यात आली.
अत्यल्प कोटा मंगळुरू-मडगाव व मुंबई-मडगाव या दोन गाड्यांचे एकत्रीकरण झाल्यास खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी या स्थानकांसाठी ‘पूल्ड कोटा’ व ‘रिमोट लोकेशन कोटा’ निर्धारित केला जाईल. यामध्ये क्षमतेच्या केवळ १५ ते २० टक्के जागा उपलब्ध असतात. उर्वरित जागा दक्षिणेकडील स्थानकांना जाऊन अत्यल्प कोटा दिल्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना तिकिटे मिळू शकणार नाहीत.
मंगळुरु-मडगाव वंदे भारतला अपुरे थांबे दिल्याने जास्त प्रतिसाद मिळालेला नाही. कारवार आणि उडुपीदरम्यान ही गाडी कुठेच थांबत नाही. मंगळुरू-मडगाव व मुंबई-मडगाव ‘वंदे भारत’चे एकत्रीकरण करून एकच गाडी न चालवता मंगळुरू-मुंबई स्वतंत्र ‘वंदे भारत’ सुरू करावी. या नव्या गाडीला सध्याच्या ‘वंदे भारत’ला नसलेले सावंतवाडी, वैभववाडी, चिपळूण, माणगाव, कुडाळ हे थांबे देता येतील. - जयवंत दरेकर, अध्यक्ष, कोकण विकास समिती