स्थायी समिती सदस्यांना जायचंय संमेलनाला !
By Admin | Updated: September 3, 2015 01:10 IST2015-09-03T01:10:20+5:302015-09-03T01:10:20+5:30
अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथे ५-६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनाही हजेरी लावायची आहे.

स्थायी समिती सदस्यांना जायचंय संमेलनाला !
मुंबई : अंदमानमधील पोर्ट ब्लेअर येथे ५-६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनाही हजेरी लावायची आहे. या संबंधीची सूचनाच सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडली आहे.
महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वीच झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत साहित्य संमेलनाला २५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत साहित्य संमेलनाचा मुद्दा चर्चेला आला. यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी विनंती केली म्हणून साहित्य संमेलनाला आर्थिक साहाय्य देणे योग्य असले तरी नाट्यसंमेलने, साहित्य संमेलने इत्यादींसाठी नगरसेवकांच्या विनंतीवरूनही आर्थिक साहाय्यतेसाठी महापालिकेने तत्पर राहावे, असे म्हणणे मनसेने मांडले. मराठी साहित्य संमेलनाला केंद्राकडूनही निधी मिळेल, असे प्रयत्न खासदारांनी करावे. महत्त्वाचे म्हणजे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महापालिकेने निधीची तरतूद करावी, असा मनसेचा सूर होता.