Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समिती अध्यक्षांचा वॉर्ड रिपोर्ट : वाहतूककोंडी, प्रदूषण, आरोग्यसेवा व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:16 IST

मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि काही प्रमाणात कष्टकरी वर्गाचे वास्तव्य, असा मुलुंड पूर्व विभागाचा चेहरा-मोहरा आहे.

जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई: मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि काही प्रमाणात कष्टकरी वर्गाचे वास्तव्य, असा मुलुंड पूर्व विभागाचा चेहरा-मोहरा आहे. मुलुंड पूर्व हा विभाग म्हणावा तसा आदर्श असला तरी अलीकडच्या काळात या विभागातील विविध समस्या ऐरणीवर येऊ लागल्या आहेत.

महापालिका मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करताना तसेच पुनर्विकासाच्या कामामुळे होणारे धुळीचे प्रदूषण, म्हाडा कॉलनी पलीकडील झोपडपट्टीवासीयांना सुविधांचा अभाव आणि पाचवीला पुजलेली वाहतूककोंडी, अशा समस्यांनी रहिवासी त्रस्त आहेत. मुलुंड पूर्व-पश्चिम पादचारी पुलाचे काम रखडल्यामुळे ये-जा करणे अवघड झाले आहे. धारावी प्रकल्पबाधितांचे येथे प्रस्तावित असलेले पुनर्वसन हा नवीन प्रश्न येथे उभा ठाकला आहे. त्याचबरोबर जुन्या इमारतींच्या पुनर्विकासामुळे सुरू असलेली बांधकामे आणि भविष्यात पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, हे प्रश्नही आहेत.

पालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर आणि एम. टी. अगरवाल या दोन रुग्णालयांतील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे रुग्ण, नातेवाईकांना प्रसंगी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे.

प्रभागाचा लेखाजोखा

९०% इमारती

१०% झोपडपट्टी

महत्त्वाचे प्रकल्प:

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे.

गोरेगाव-मुलुंड लिंक रोड.

प्रभाग क्र.: १०६

भागाचे नाव: 'टी' वॉर्ड

विधानसभा मतदारसंघ: मुलुंड

लोकसभा मतदारसंघ: उत्तर पूर्व मुंबई

प्रभागाची लोकसंख्या: सुमारे ५० हजार

असे आहे प्रभागाचे भौगोलिक क्षेत्र

प्रमुख रस्ते: ९० फुटी रस्ता, नवघर रोड

महत्त्वाचे भाग: मिठागर रोड, दीनदयाल नगर, म्हाडा कॉलनी, गावठाणे

शैक्षणिक संस्था: लक्ष्मीबाई शाळा, वझे-केळकर महाविद्यालय

महत्त्वाची धार्मिक/सामाजिक स्थळे: तुंगारेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर

रुग्णालये: स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालय, एम. टी. अगरवाल रुग्णालय

"प्रभागात खेळाचे मैदान, जलतरण तलाव, सार्वजनिक वाचनालय उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. आरक्षित भूखंडांचा विकास करून सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. वाहतूककोंडी दूर करण्यासाठी नवीन रस्ता खुला आहे. म्हाडा कॉलनीतून एक नवीन पूल आनंदनगरच्या दिशेने बांधत आहोत. आनंदनगर झोपडपट्टी सीआरझेडमध्ये असल्याने विकसित होत नाही. तेथील रहिवाशांना 'पीएपी'मध्ये पर्यायी जागा किंवा तेथे एसआरए प्रकल्प उभारण्याबाबत विचार सुरू आहे."— प्रभाकर शिंदे, नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष

प्रभागातील प्रमुख समस्या

धूळ आणि प्रदूषण: मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी तेथे सध्या मातीचा भराव टाकला जात आहे. त्याकरिता मातीचे ट्रक येत असल्यामुळे परिसरात धूळ पसरते. त्याचबरोबर इमारतींच्या बांधकामामुळे धूळ उडत असल्याने प्रदूषणात भर पडत आहे.

वाहतूककोंडी: पूर्व द्रुतगती महामार्गावरून शेकडो वाहने मुलुंडमध्ये प्रवेश करतात. तेथे प्रामुख्याने सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. स्टेशनपर्यंत वाहने कासवगतीने पुढे सरकत असतात.

पादचारी पुलाचे काम रखडले: मुलुंड पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाचे काम बराच काळ रखडलेले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला ये-जा करणे कठीण झाले आहे.

आरोग्य व्यवस्था: स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अगरवाल रुग्णालय ही गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहेत. या दोन्ही रुग्णालयांत पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णांना अनेकदा थेट घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय गाठावे लागते.

"धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टँकर आणि मिस्ट मशीन कार्यरत केले आहेत. कंत्राटदारांना वायू प्रदूषणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या पूर्व-पश्चिम पादचारी पुलाचे पश्चिमेकडील काम पूर्ण झाले असून, पूर्वेकडील काम सध्या प्रगतिपथावर आहे."— योगिता कोल्हे, सहायक आयुक्त, 'टी' वॉर्ड

स्थानिक काय म्हणतात?

"म्हाडा कॉलनी मागील झोपडपट्टीत सुमारे १,२०० घरे आहेत. तिथे कायम अस्वच्छता असते. अनेकदा बंद पथदिवे असतात. खड्ड्यांमुळे चालणेही अवघड होत आहे. रात्रीच्या वेळेस चोरी होण्याची भीती असते. दुसरीकडे टॉवर उभे राहत आहेत. त्यांना सोयी-सुविधा पुरवल्या जात आहेत; पण झोपडपट्टीवाल्यांना बेदखल केले जात आहे."— पवन जंगम, मुलुंड

"रेल्वे स्टेशन परिसर ते पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुलुंड सिग्नल या पट्ट्यात कमालीची वाहतूककोंडी होते. महामार्ग सिग्नल ते स्टेशनपर्यंत काही वेळाचे अंतर कापण्यासाठी बराच वेळ लागतो. ही कोंडी फोडण्यासाठी पहिल्या टप्प्यातील नवीन मार्ग सुरू केला आहे, परंतु पूर्णतः दिलासा मिळालेला नाही. पार्किंगचा प्रश्न, आरोग्य सेवेचा मोठा प्रश्न आहे."— महेंद्र शिर्के, मुलुंड

प्रभागातील रेटिंग (स्टार्स):

रस्ते: ★★★ (३/५)

स्वच्छता: ★★★ (३/५)

हवेचा दर्जा: ★★ (२/५)

आरोग्य: ★★ (२/५)

पार्किंग: ★★ (२/५)(अतिशय चांगले - ५ स्टार, चांगले - ४, ठिकठाक - ३, वाईट - २, अत्यंत वाईट - १)

English
हिंदी सारांश
Web Title : Mulund Ward Report: Traffic, Pollution, Healthcare on Ventilator

Web Summary : Mulund East faces traffic congestion, pollution from dumping ground and construction, and inadequate healthcare. The delayed pedestrian bridge adds to woes. Proposed rehabilitation and old building redevelopment strain infrastructure. Locals cite issues with cleanliness, streetlights, and safety in slum areas.
टॅग्स :मुंबई