खड्डे भरल्याने वाहनांची रखडपट्टी थांबली
By Admin | Updated: February 12, 2015 22:40 IST2015-02-12T22:40:38+5:302015-02-12T22:40:38+5:30
ठाकुर्ली रेल्वे स्थानकालगतच्या फाटकातून वाहने पूर्व-पश्चिमेस जातात. मात्र, त्या वाहनांसाठी जो रस्ता रुळांमधून गेला आहे

खड्डे भरल्याने वाहनांची रखडपट्टी थांबली
डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकालगतच्या फाटकातून वाहने पूर्व-पश्चिमेस जातात. मात्र, त्या वाहनांसाठी जो रस्ता रुळांमधून गेला आहे, त्यावर पडलेले खड्डे भरल्याने वाहनांची क्रॉसींगवरच होणारी धोकादायक रखडपट्टी थांबली आहे.
सुरक्षा यंत्रणेची ही अडचण लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या यात्री उपभोक्ता समितीने हे गाऱ्हाणे डीआरएम (विभागीय व्यवस्थापक) यांना सांगितल्यानंतर आठवडाभरातच ही समस्या निकाली निघाली. या रस्त्याची डागडुजी करण्यात आली असून दोन दिवसांपासून तेथून वाहने सुरळीत बाहेर पडत असल्याने त्याचा लाभ फाटक बंद करण्यासह अन्य तांत्रिक बाबींना होणार आहे.
रेल्वेच्या दृष्टीने दिवा-ठाकुर्ली स्थानकांदरम्यान असलेले फाटक हे डोकेदुखी ठरत आहे़ त्यातच जेवढा वेळ फाटक उघडे असते, त्या कालावधीत योग्य रस्त्याअभावी वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते. फाटक बंद करण्याची वेळ झाली तरीही वाहने रुळांतच अडकल्याने ते बंद करता येत नव्हते. त्याचा परिणाम लोकल वाहतुकीवरही होतो. त्यासाठी येथील रुळांलगतच्या रस्त्याचे काम होणे अत्यावश्यक होते. डोंबिवली आरपीएफने याबाबत वरिष्ठांना सांगून लोकल खोळंबण्यामागील एक कारण सांगितले. ही अडचण अनेक महिन्यांपासून होती. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नव्हते.
याबाबत आरपीएफच्या एका अधिकाऱ्याने डीआरयूसीसीच्या सदस्याला सांगितले. त्यांनीही गांभीर्याने तातडीने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांच्या निदर्शनास ही बाब आणली. निगम यांनीही तातडीने येथील काम करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.
त्यानुसार, गेल्या दोन दिवसांपासून येथील रस्त्याची डागडुजी करण्याचे काम पूर्ण झाले असून आता तेथून वाहने सुरळीत जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
(प्रतिनिधी)