Join us  

एसटीची वाहतूक सुरळीत, संपाकडे कर्मचाऱ्यांची पाठ; कुठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 6:42 AM

महाराष्ट्रातील २५० आगारांतील सर्व  बसफेऱ्या रात्री उशिरापर्यंत एसटी आगारातून व्यवस्थित निघाल्या. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

मुंबई : सातवा वेतन आयोग आणि विलीनीकरण या मागण्यांसाठी एसटी कष्टकरी जनसंघ संघटनेने ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली होती. मात्र, त्याकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे नेहमीप्रमाणे एसटी वाहतूक सुरळीत होती.महाराष्ट्रातील २५० आगारांतील सर्व  बसफेऱ्या रात्री उशिरापर्यंत एसटी आगारातून व्यवस्थित निघाल्या. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. वाहतूक सुरळीत सुरू आहे, असे एसटी महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, या संपावरून आता एसटी कर्मचारी संघटनांमध्येच जुंपली आहे. सदावर्ते यांनी साडेपाच महिन्यांचा संप मागे घेताना सातवा वेतन आयोग मिळाला, असा दावा केला होता, तर आता पुन्हा सातवा वेतन आयोग मागत आहेत, असा सवाल इतर एसटी कर्मचारी काँग्रेस आणि महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेने केला आहे.

सदावर्ते यांनी केलेल्या बंदच्या आवाहनाला कामगारांनी झिडकारले. १०० टक्के वाहतूक चालू होती. आपली अवहेलना झाकण्यासाठी त्यांनी उद्योगमंत्र्यांची बैठक लावून घेतली. सदावर्ते हे प्रसिद्धीसाठी कामगारांना वापरून घेऊन आंदोलने करतात, हे एसटी कामगारांनी ओळखले आहे.- संदीप शिंदे, अध्यक्ष , महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

एसटी कष्टकरी जनसंघाने दिलेल्या काम बंद आंदोलनाच्या नोटिशीला कामगारांचा पाठिंबा दिसत नव्हता. आंदोलनाचा फज्जा उडाला होता. सणासुदीच्या काळात एसटी बँकेतील कर्ज व्यवहार बंद आहेत. त्यामुळे सदावर्तेंविरोधात र्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

टॅग्स :एसटी संपएसटी