देवबांध घाटात एसटीला अपघात
By Admin | Updated: December 29, 2014 00:17 IST2014-12-29T00:17:12+5:302014-12-29T00:17:12+5:30
मोखाड्याहून खोडाळा येथे येणाऱ्या जव्हार-केवनाळा बसला सकाळी ८.३० दरम्यान देवबांध घाटात भीषण अपघात झाला.

देवबांध घाटात एसटीला अपघात
मोखाडा : मोखाड्याहून खोडाळा येथे येणाऱ्या जव्हार-केवनाळा बसला सकाळी ८.३० दरम्यान देवबांध घाटात भीषण अपघात झाला. स्टेअरिंग तुटल्याने तसेच ऐनवेळी ब्रेक फेल झाल्याने बस दरीत कोसळली. यात २ वृद्ध महिलांच्या मणक्याला जबर मार लागला असून ४ प्रवासी किरकोळ जखमी आहेत. जखमींना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गंभीर जखमींमध्ये यमुना किसन कोर्डे (८०), इंदू हिरू जाधव (६५) यांचा समावेश आहे, तर सोनाली भालचंद्र भोईर (२५), हिरू अणाजी जाधव (७०), दिनकर शंकर गारे (३५), प्रकाश किसन भोईर (२५), विष्णू ढवळू खुताडे (३०) आणि विष्णू विजय खुताडे (८) हे किरकोळ जखमी झाले आहेत. ही बस सकाळी ८ वाजता केवनाळा येथून मोखाडा येथे खोडाळामार्गे प्रस्थान करते व पुन्हा मोखाड्याहून खोडाळा येथे मार्गस्थ होते. या दरम्यानच हा अपघात झाला.
जव्हार आगार हे नादुरुस्त गाड्यांचे माहेरघर आहे. या आगाराकडील बहुतांश बसेसचे दुरुस्तीचे काम हे स्पेअर पार्टअभावी थातूरमातूर स्वरूपात केले जाते. त्यात टाटा कंपनीच्या ७ बसेसना कधीही स्पेअर पार्ट उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या बसेस किरकोळ दुरुस्ती करून सोडल्या जातात. याबाबत जव्हार आगार व्यावस्थापनाशी संपर्क साधला असता बसेसचे स्पेअर पार्टच उपलब्ध होत नसल्याचे सांगितले.