Join us  

एसटीत आठ हजार जागांसाठी चालक, वाहक पदाची भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 6:21 AM

दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी एसटीने चालक, वाहक पदांच्या ४ हजार ४१६ जागांसाठी भरती जाहीर केल्यानंतर इतर जिल्ह्यांसाठी ३ हजार ६०० नव्या जागांसाठी भरती शुक्रवारी जाहीर केली आहे.

मुंबई -  दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांसाठी एसटीने चालक, वाहक पदांच्या ४ हजार ४१६ जागांसाठी भरती जाहीर केल्यानंतर इतर जिल्ह्यांसाठी ३ हजार ६०० नव्या जागांसाठी भरती शुक्रवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यात एकूण ८ हजार २२ इतक्या जागांसाठी चालक आणि वाहक पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये महिलांना ३० टक्के आरक्षण दिल्याने महिला उमेदवारांना तब्बल २ हजार ४०६ जागांसाठी अर्ज करता येतील. सर्व उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे.याआधी दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यांमध्ये ४ हजार ४१६ जागांसाठी ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र इतर जिल्ह्यांप्रमाणेच संबंधित जिल्ह्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. या जागांसाठी २४ फेब्रुवारीला संबंधित जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा होईल. महत्त्वाचे म्हणजे हलके वाहन चालवण्याचा एक वर्षाचा परवाना असलेल्या महिलांनाही भरतीसाठी अर्ज करता येईल. भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर संबंधित महिला उमेदवारांना एसटी महामंडळातर्फे अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. रावते म्हणाले की, महिला उमेदवारांना शारीरिक उंचीच्या अटीमध्येही सवलत देण्यात आली आहे. पूर्वी किमान १६० सेंमी उंच असलेल्या महिला उमेदवारांना भरतीसाठी पात्र धरले जात होते. मात्र आता भरतीसाठी उंचीची मर्यादा किमान १५३ सेंमी केली आहे. एसटीने नुकतीच २१ आदिवासी युवतींची बसचालक पदी भरती केली. त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच त्या बसेस चालवतील. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट ३ वर्षांऐवजी १ वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे. अवजड वाहन चालविण्याचा ३ वर्षांचा अनुभव असलेले पुरेसे उमेदवार मिळत नसल्याचे मागील भरती प्रक्रियेत दिसून आले होते. त्यामुळे ही अट शिथिल केल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.आतापर्यंत २८९ महिला उमेदवारांनी केला अर्जचालक पदासाठी महिला उमेदवारांनाही अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे बंधनकारक होते. मात्र ही अट रद्द केल्याने शुक्रवारपर्यंत २८९ महिला उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज केले. परीक्षेनंतर महिला चालकांना प्रशिक्षण कालावधीत विद्यावेतन मिळेल. प्रशिक्षणानंतर महिला उमेदवारांना आरटीओकडून रीतसर अवजड वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त झाल्यानंतर या महिला एसटीच्या बस चालवू शकतील.

टॅग्स :राज्य परीवहन महामंडळ