एसटी पंक्चर; प्रवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2015 22:39 IST2015-05-08T22:39:30+5:302015-05-08T22:39:30+5:30
‘हात दाखवा, एसटी थांबवा’ ‘गाव तिथे एसटी’पासून ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत’ आदी उपक्रमांमुळे एसटी खेडोपाडी पोहोचली. या एसटीने राज्यभरातील लाखो

एसटी पंक्चर; प्रवासी हैराण
अमोल पाटील, खालापूर
‘हात दाखवा, एसटी थांबवा’ ‘गाव तिथे एसटी’पासून ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत’ आदी उपक्रमांमुळे एसटी खेडोपाडी पोहोचली. या एसटीने राज्यभरातील लाखो नागरिक प्रतिदिन प्रवास करतात. सध्या मात्र अनेक ठिकाणी एसटी परिवहनच्या कारभाराला गालबोट लागल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर परळ ते कोल्हापूर धावणारी एसटी पंक्चर झाली आणि भरउन्हात प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
पाच मे रोजी सकाळी मुंबई परळ डेपोतून कोल्हापूरला जाण्यासाठी निघालेल्या (एमएच १४ बीटी ४०४४) एसटीचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे खालापूर हद्दीत टायर पंक्चर झाला. त्यामुळे चालकाने एसटी रस्त्याच्या कडेला उभी केली.
लांबपल्ल्याची एसटी असल्याने टायर पंक्चर काढण्यासाठी लागणारी साधनसामग्री गाडीत असणे आवश्यक होते, मात्र अशी कोणतीच उपकरणे एसटीत नव्हती. एसटीचालक व वाहकाने पुण्याकडे जाणाऱ्या काही एसटींना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तासभर एकही एसटी थांबली नाही. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होऊ लागला. अखेर एका ट्रकचालकाने आपल्याकडील पंक्चर काढण्याचे सामान दिल्यावर त्याच्या मदतीने पंक्चर झालेला टायर बदलण्यात चालक-वाहकाला यश आले. त्यानंतर दोन-अडीच तासांनंतर एसटी कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली.
महामार्गावरून प्रवास करताना एसटी नादुरुस्त झाल्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. मात्र त्यावर एसटी महामंडळाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.