Join us  

CoronaVirus News: कोकणात जाणाऱ्या 'त्या' प्रवाशांना ई-पासची गरज नाही, ठाकरे सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 4:17 PM

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही ई-पासची गरज नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

मुंबई- गणेशोत्सवासाठी कोकणात जायला ई-पास लागणार की नाही, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होते.  राज्य सरकारने मोठा निर्णय घेत कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही ई-पासची गरज नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पण खासगी वाहनांनी जाणाऱ्या वाहनचालकांना ई-पास आवश्यक असल्याचंही ठाकरे सरकारनं अधोरेखित केलं आहे. तसेच काही नियम पाळावे लागणार असून, त्याचं पालन करूनच कोकणात जाता येणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे.एसटीनं जे प्रवासी जाणार आहेत, त्यांना ई-पासची गरज नाही. एसटी हाच तुमचा ई-पास असेल. पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असल्यानं तुमची पूर्ण माहिती आमच्याकडे अगोदरच आलेली आहे. परंतु जे एसटी व्यतिरिक्त जातील, त्यांच्यासाठी ई-पास गरजेचा असेल, असं परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी सांगितलं आहे. खासगी वाहनांना ई-पास सक्तीचा असून, त्यांना ई-पास घेऊनच कोकणात जावं लागणार आहे. खासगी बसचालकांना एसटीच्या तिकिटापेक्षा फक्त दीड पट जास्त पैसे तिकिटाच्या स्वरूपात आकारता येतील. म्हणजे एसटीचं तिकीट १०० रुपये असल्यास खासगी बसचालक १५० रुपयांपर्यंत पैसे आकारू शकतात. त्यापेक्षा जास्त पैसे खासगी बसचालकांनी वसूल केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 

सरकारनं  कोकणवासीयांसाठी हे धोरण जाहीर केलेलं असून, कोकणात  जाणाऱ्या चाकरमान्यांना हे मान्य करावं लागणार आहे. लोकांना बाजारात मोठ्या प्रमाणात जाणं टाळलं पाहिजे, तसेच आरत्या आणि भजनं कोरोनामुळे करू नये, असंही आवाहनही सरकारतर्फे करण्यात आलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 14 दिवसांऐवजी आता 10 दिवस होम क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. १२ ऑगस्टच्या आधी कोकणात जाणाऱ्यांसाठी हा नियम लागू असेल. तर त्यानंतर कोकणात जाऊ इच्छिणाऱ्यांना स्वॅब चाचणी बंधनकारक असेल. राज्य सरकारनं याबद्दलचे निर्देश दिले आहेत. कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी संध्याकाळपासून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरे