सेंट जॉर्जेसच्या डॉक्टरांनी घडवून आणली आईची भेट; १४ वर्षांच्या तरुणचे वडील मात्र अद्याप बेपत्ताच

By संतोष आंधळे | Updated: December 20, 2024 11:39 IST2024-12-20T11:38:40+5:302024-12-20T11:39:28+5:30

बोट दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणला सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

st george doctor reunites mother with 14 year old boy but father still missing | सेंट जॉर्जेसच्या डॉक्टरांनी घडवून आणली आईची भेट; १४ वर्षांच्या तरुणचे वडील मात्र अद्याप बेपत्ताच

सेंट जॉर्जेसच्या डॉक्टरांनी घडवून आणली आईची भेट; १४ वर्षांच्या तरुणचे वडील मात्र अद्याप बेपत्ताच

संताेष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बोट दुर्घटनेत १४ वर्षांचा तरुण भाटी हा आई संतोषीदेवी, वडील हंसाराम आणि चुलत भावासोबत होता. त्यावेळी या दुर्घटनेत तो पाण्यात पडल्यानंतर त्याला आजूबाजूच्या बोटींमधून आलेल्या लोकांनी वाचविले आणि उपचारासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी त्याच्यासोबत कुटुंबातील सदस्य कुणीच नव्हते. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या आईचा मध्यरात्रीपर्यंत शोध घेऊन आईची भेट घडवून आणली. तरुणला आई सापडली असली तरी गुरुवारी संध्याकाळी त्याच्या वडिलांचा मृतदेह सापडला. 

बोट दुर्घटनेतून बचावलेल्या तरुणला सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी तो माझे आई वडील कुठे आहेत? असा सवाल करत होता. त्यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षवर्धन बनसोडे यांनी त्याच्या पालकांना शोधण्यास सुरुवात केली.

डॉ. बनसोडे यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन करून तरुण भाटी नावाचा मुलगा सेंट जॉर्जेस रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. तेव्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून त्यांची आई गेटवे ऑफ इंडियाला असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर भाटी यांचे नातेवाईक रमेश बोराणा हे रुग्णालयात गेले. त्यांची एकमेकांची ओळख पटल्यानंतर तरुणचे त्यांनी आईशी बोलणे करू दिले. उपचारानंतर तरुणला डिस्चार्ज दिल्यानंतर आईला भेटण्यासाठी तरुणला ते घेऊन गेले. त्याची आई गेट वे ऑफ इंडिया त्याची वाट बघत होती. मात्र गुरुवारी सायंकाळी  हंसाराम यांचा मृतदेह सापडला.

‘सेट जॉर्जेस’मधून सर्व रुग्णांना डिस्चार्ज

बोट दुर्घटनेतील नऊ रुग्णांना सेट जॉर्जेस रुग्णालयात बुधवारी संध्याकाळी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर होती. त्यामुळे गुरुवार संध्याकाळापर्यंत सर्व रुग्णांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती रुग्णलायचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.

बदलापूरच्या मंगेशचा मृत्यू

बदलापूर : मुंबईतील बोट दुर्घटनेत बदलापुरातील मंगेश केळशीकर यांचा मृत्यू झाला. ते नौदलाला बोट पुरवण्यात कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर होते. स्पीड बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू असताना हा अपघात झाला. मंगेश यांच्या निधनामुळे केळशीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. चौगुले फायबर ग्लास शिफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत मंगेश काम करीत होते. नौदलाला पुरवण्यात आलेल्या बोटीच्या इंजिनची चाचणी करताना मंगेश हेही त्या बोटीत होते. बोट अनियंत्रित झाली आणि प्रवासी बोटीला धडकली. या अपघातात मंगेश यांचाही मृत्यू झाला. त्यांची पत्नी  गर्भवती असून, कुटुंबात तेच एकमेव कमावते होते. मंगेश यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगेश यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांचा एकमेव आधार हरपला आहे. यापुढे कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचाही प्रश्न आहे.  
 

Web Title: st george doctor reunites mother with 14 year old boy but father still missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई