Join us
Daily Top 2Weekly Top 5

ST बस, बस स्टँड अन् प्रसाधनगृहेही होणार चकाचक, महामंडळाची स्वच्छता त्रिसुत्री

By नितीन जगताप | Updated: December 5, 2022 14:26 IST

मुख्यमंत्री यांनी प्रवासी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाने बसेसची स्वच्छता, बसस्थानके टापटीप ठेवणे तसेच स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश दिले होते.

मुंबई : प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने कंबर कसली असून रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल, बसस्थानक व परिसर स्वच्छ व टापटीप असेल या बरोबरच प्रत्येक बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही स्वच्छ व निर्जंतुक असतील, यांवर भर दिला जात आहे.

मुख्यमंत्री यांनी प्रवासी संख्या वाढविण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाने बसेसची स्वच्छता, बसस्थानके टापटीप ठेवणे तसेच स्वच्छतागृहे चांगल्या स्थितीत ठेवण्यावर भर द्यावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बसेस, बसस्थानक व परिसर तसेच प्रसाधनगृहे स्वच्छ व टापटीप ठेवण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्वच्छतेचे आगार निहाय नियोजन करण्यात येत असून, जिथे महामंडळाचे स्वच्छक नाहीत तेथे स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार कंत्राटी स्वच्छक नेमून स्वच्छता करून घ्यावी. गरज पडल्यास निविदा प्रक्रिया राबवून विभागीय स्तरावर स्वच्छता संस्था नेमण्यात यावी. ज्या आगारात स्वयंचलित बस धुलाई यंत्र नाहीत, तेथे नव्याने धुलाई यंत्र जोडण्यात यावेत असे आगार प्रमुखांना सांगण्यात आले आहे.

बसेसच्या स्वच्छतेबाबत पंचसुत्री

१बसेसची अंतर्बाह्य सखोल स्वच्छता२ बसच्या खिडक्या सरकत्या व पारदर्शक ठेवणे, खराब खिडक्या त्वरित बदलून घेणे३ गळक्या बसेस मार्गस्थ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ४ बसमधील आसने सुस्थितीत असतील याची दक्षता घ्यावी, तसेच फाटलेल्या सीट तातडीने दुरुस्ती करून घ्याव्यात. ५ बसचा अंतर बाह्य रंग उडाला असल्यास रंगरंगोटी करून घ्यावी अशा सुक्ष्म सुचनांचा समावेश आहे.

जनजागृती वर भर

स्वच्छतेबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वच्छतादूत नेमण्यात येणार आहे. यासाठी महामंडळाने भित्तिपत्रके, सुचना वजा सुभाषिते, उद्घोषणा, यांचा प्रभावी वापर करून एसटी कर्मचारी व प्रवासी यांच्यामध्ये स्वच्छतेबध्दल जाणीव - जागृती घडवून आणण्याचा संकल्प केला आहे. 

टॅग्स :बसचालकप्रवासीमुंबईमुख्यमंत्री