उत्तर मुंबईतील SRA प्रकल्पांना वेग; रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार, कामे मार्गी लागली!

By मनोहर कुंभेजकर | Updated: May 12, 2025 19:03 IST2025-05-12T19:02:22+5:302025-05-12T19:03:10+5:30

उत्तर मुंबईतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन अनेक वर्षांपासून रखडले होते.

SRA projects in North Mumbai gain momentum List of stalled projects ready work on them underway | उत्तर मुंबईतील SRA प्रकल्पांना वेग; रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार, कामे मार्गी लागली!

उत्तर मुंबईतील SRA प्रकल्पांना वेग; रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार, कामे मार्गी लागली!

मनोहर कुंभेजकर, मुंबई: उत्तर मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसनाला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली असून, रखडलेल्या प्रकल्पांची यादी तयार करून त्यांना मार्गी लावण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी "उत्तर मुंबईला झोपडपट्टीमुक्त करून उत्तम मुंबई घडवायची" ही भूमिका घेत ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर मुंबईतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन अनेक वर्षांपासून रखडले होते. अनेक विकासकांनी अर्धवट प्रकल्प सोडल्याने रहिवासी अडचणीत सापडले होते. हे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले असून, दिरंगाई करणाऱ्या विकासकांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 गोयल यांच्या पुढाकारामुळे मागाठाणे येथील देवीपाडा आणि चारकोप येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना नवसंजीवनी मिळाली. नुकतेच कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरवाडीतील जय संतोषी माँ गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए प्रकल्पाचे उद्घाटन पीयूष गोयल यांच्या हस्ते झाले. यावेळी १४९ रहिवाशांना पुनर्वसन सदनिकांची चावी वाटण्यात आली. लक्ष्मी कृपा गृहनिर्माण संस्था (बाबरेकर नाका, कांदिवली प.), शिवशक्ती एसआरए (कांदिवली गावठण, कांदिवली प.), संतोषी माँ गृहनिर्माण संस्था (शिवाजी रोड, कांदिवली प.) इथे नागरिकांना नवीन घरे देण्यात आली आहेत. या तिन्ही एसआरएच्या इमारती दोन वर्षांत बांधून पूर्ण केलेल्या आहेत. आतापर्यंत एकूण ४४९ नागरिकांना नवीन घरे मिळाली आहेत. 

कांदिवली पश्चिम चारकोप येथील श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाच्या आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक सहाय्याने पूर्ण झालेल्या या प्रकल्पातून अनेक कुटुंबांना पुनर्वसन मिळाले आहे.

बोरिवली पश्चिमेकडील महात्मा फुले नगर येथील ९१ पात्र झोपडीधारकांना पुनर्वसन योजनेतून सदनिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी गोयल यांनी अधिकाऱ्यांना, "उत्तर मुंबईत एकही नवीन झोपडी उभारली जाऊ नये. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी," असे स्पष्ट निर्देश दिले.

गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या देवीपाडा येथील प्रकल्पाला आता भाडे वितरित करण्यात आले असून, पुनर्वसनास गती मिळाली आहे. बोरिवली पूर्वेतील राजेंद्र नगरमधील प्रकल्प देखील मार्गी लागण्याच्या वाटेवर आहे. दर दोन महिन्यांनी बैठका घेऊन प्रगतीचा आढावा घेतला जातो.

रखडलेल्या प्रकल्पांमध्ये रहिवाशांना विकासक निवडण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. कोणताही राजकीय हस्तक्षेप न करता ही निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. यासाठी केंद्रीय मंत्री गोयल यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. उत्तर मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने हे टाकलेले पावले निश्चितच ऐतिहासिक ठरणार असून, शेकडो कुटुंबांचे स्वप्न आता वास्तवात उतरू लागले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

Web Title: SRA projects in North Mumbai gain momentum List of stalled projects ready work on them underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.