Join us  

मिनी वातानुकूलित बेस्ट बसला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४८ लाख प्रवाशांनी केला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 1:18 AM

छोट्या मार्गांवर म्हणजे घर ते रेल्वे स्थानकांपर्यंत या बस चालविण्यात येणार आहेत. जुलै २०१९ पासून बेस्ट उपक्रमाने प्रवासी भाडे किमान पाच ते कमाल २० रुपये केले आहे

मुंबई : अवघ्या सहा रुपयांत गारेगार प्रवास करण्यास मिळत असल्याने बेस्ट उपक्रमाच्या वातानुकूलित बस सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशा ४२० वातानुकूलित मिनी बस गाड्या रस्त्यावर धावत आहेत. वातानुकूलित बस सेवेची मागणी वाढत असल्याने आणखी काही नवीन बस मार्ग बेस्ट प्रशासनाने गुरुवारपासून सुरू केले आहेत.

प्रवासी भाड्यामध्ये कपात केल्यानंतर बेस्ट उपक्रमाने सप्टेंबर २०१९ मध्ये वातानुकूलित मिनी बस आणल्या. त्यानुसार सप्टेंबर ते जानेवारी या काळात मिनी बसमधून तब्बल ४८ लाख प्रवाशांनी आतापर्यंत प्रवास केला आहे. छोट्या मार्गांवर म्हणजे घर ते रेल्वे स्थानकांपर्यंत या बस चालविण्यात येणार आहेत. जुलै २०१९ पासून बेस्ट उपक्रमाने प्रवासी भाडे किमान पाच ते कमाल २० रुपये केले आहे. यामध्ये वातानुकूलित बसचा प्रवासही किमान सहा रुपये करण्यात आल्याने मुंबईकरांची बस थांब्यांवर गर्दी होऊ लागली. प्रवाशांकडून वातानुकूलित मिनी बसची मागणी प्रचंड वाढली आहे. दर दहा मिनिटांनी या बस चालविण्यात येत असल्याने प्रवाशांना बस थांब्यांवर तिष्ठत राहावे लागत नाही, असे दिसून येत आहे. मिनी एसी बससेवा सप्टेंबर २०१९ मध्ये बेस्ट उपक्रमाने दक्षिण मुंबईतून सुरू केली. या भागात एसी सेवेला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर बेस्ट उपक्रमाने अन्य मार्गांवर ही मिनी वातानुकूलित बस सेवा सुरू केली. शेअर टॅक्सीसाठी प्रवाशांना किमान १० रुपये मोजावे लागतात. त्याच वेळी वातानुकूलित बसमधून अवघ्या सहा रुपयांत प्रवास करता येतो. तसेच बेस्ट उपक्रमाने रेल्वे स्थानकांना जोडूनच ही बस सेवा ठेवल्यामुळे प्रवाशांना सोयीचे ठरत आहे. मिनी वातानुकूलित बसमध्ये २१ आसन व्यवस्था असून, सात प्रवासी उभे राहू शकतात. या बस सात वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या आहेत.गुरुवारपासून सुरू केलेले नवीन वातानुकूलित मिनी बस मार्गए-२५८ गोरेगाव बस स्थानक(प.) ते राम मंदिर स्थानक - मोतीलालनगर, भगतसिंहनगर, बेस्टनगर मार्गे सकाळी ६.३० ते रात्री १०. (दर १० मिनिटांनी)ए-२११ वांद्रे बस स्थानक(प.) ते चुईम गाव सकाळी ६ ते रात्री १०. (दर १० मिनिटांनी)ए-२१४ वांद्रे बस स्थानक(प.) ते माउंट मेरी स्टेप्स सकाळी ६ ते रात्री १०. (दर १० मिनिटांनी)

टॅग्स :बेस्ट