तिळगुळावर भाववाढीची संक्रांत टळली
By Admin | Updated: January 14, 2015 23:14 IST2015-01-14T23:14:08+5:302015-01-14T23:14:08+5:30
मकरसंक्रांत म्हणजे आठवतो तो तिळगूळ आणि गुळाची पोळी. वाढत्या महागाईने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला

तिळगुळावर भाववाढीची संक्रांत टळली
दीपक मोहिते, सुनील घरत, वसई/पारोळ
मकरसंक्रांत म्हणजे आठवतो तो तिळगूळ आणि गुळाची पोळी. वाढत्या महागाईने नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला असताना, दुसरीकडे मात्र तिळगूळ बनवण्यासाठी लागणाऱ्या तिळ, गूळ, शेंगदाणे, इ.चे भाव गेल्या वर्षीपेक्षा कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गुळाचे भाव स्थिर राहिल्याने तिळगुळावर भाववाढीची संक्रांत या वर्षी टळली आहे.
मकरसंक्रांतीचा उत्सव हा भारतभर विविध प्रकारे साजरा केला जातो. तिळगूळ घ्या व गोड गोड बोला, असे सांगत तिळगूळ वाटले जातात. गेल्या वर्षी तिळाचे भाव २०० रु. किलो होते, तेच भाव या वर्षी १६० रुपये इतके आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे गुळाचे भाव ५० रुपये इतकेच स्थिर आहेत. त्यामुळे या वर्षी तिळगूळ खरेदी करताना खिशाला कात्री लागणार नाही.
पूर्वी ग्रामीण भागात तिळाचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत होते. त्याचा तिळाचे तेल व तिळगुळासाठी उपयोग करीत असत. पण, आता तिळाचे उत्पन्न कमी झाल्याने नागरिकांना आता बाजारातील तिळांवर अवलंबून राहावे लागते. पण, या वर्षी तिळगूळ बनवण्याच्या साहित्याची भाववाढ न झाल्याने तिळगुळाचा गोडवा या वर्षी नक्की वाढणार आहे.