Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा तपासणीला वेग; मोनोरेल महिनाअखेरीस ‘ट्रॅक’वर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 10:55 IST

मोनो मार्गिका २० किमी लांबीची असून, त्यावर १७ स्थानके आहेत. ही मोनोरेल सतत बिघाडांच्या सत्रामुळे २० सप्टेंबर २०२६ पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बंद पडलेली  मोनोरेल पुन्हा धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मोनोरेल मार्गिका सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण सुरक्षा तपासणी पुढील आठवड्यात होणार आहे. त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत मोनो पुन्हा ट्रॅकवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मोनो मार्गिका २० किमी लांबीची असून, त्यावर १७ स्थानके आहेत. ही मोनोरेल सतत बिघाडांच्या सत्रामुळे २० सप्टेंबर २०२६ पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर मोनोरेल मार्गावर जुनी यंत्रणा काढून नवीन यंत्रणा बसविण्याचे काम एमएमआरडीएने पूर्ण केले आहे. त्यामुळे आता मोनो मार्गिका सुरू करण्यापूर्वी ‘एमएमआरडीए’ने सर्व तपासण्या पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता मोनो सुरू करण्यासाठी अंतिम सुरक्षा तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी निवृत्त मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पदम सिंग बघेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळताच  संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर मार्गावर मोनोरेल धावणार आहे.

पाच वर्षांसाठी मार्गिका चालविण्यासाठी ठेकेदार नियुक्त

सद्यस्थितीत एमएमआरडीएने मोनोरेल संचलन आणि देखभाली करण्यासाठी आता खासगी कंत्राटदार नेमला आहे. यासाठी पॉवर मेक प्रोजेक्ट्स कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. कंत्राटदाराला पाच वर्षांसाठी संपूर्ण मोनोरेल मार्गिका चालवावी लागणार आहे. यामध्ये मोनोचे परिचालन, स्थानक व्यवस्थापन, डेपो हाताळणी, गाड्यांची देखभाल दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.

मोनोच्या ताफ्यात नव्या १० गाड्या दाखल

 मोनोच्या ताफ्यात नव्या १० गाड्या दाखल झाल्या आहेत. एमएमआरडीएने यापूर्वीच त्यांच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत.

जागतिक पातळीवरील नामांकित ‘ब्युरो व्हेरिटास’ या संस्थेकडून मोनोची तपासणी पूर्ण झाली असून, या संस्थेने ‘इंडिपेंडंट सेफ्टी असेसमेंट’ (आयएसए) सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे.

तसेच आता केवळ सुरक्षा तपासणी होऊन मोनो सुरू करण्यासाठी हिरवा कंदील मिळणे बाकी आहे. तो मिळताच मोनो पुन्हा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.