जिल्ह्यातील वाळीत प्रकरणांवर होणार भाष्य
By Admin | Updated: December 21, 2014 23:11 IST2014-12-21T23:11:09+5:302014-12-21T23:11:09+5:30
एखाद्या कुटुंबात ‘सासू आणि सून’ या दोघींचाही वाढदिवस एकाच दिवशी असणे असा योग विरळाच. परंतु असा योग एखाद्या राजकारणी कुटुंबात जुळून आला
जिल्ह्यातील वाळीत प्रकरणांवर होणार भाष्य
जयंत धुळप, अलिबाग
एखाद्या कुटुंबात ‘सासू आणि सून’ या दोघींचाही वाढदिवस एकाच दिवशी असणे असा योग विरळाच. परंतु असा योग एखाद्या राजकारणी कुटुंबात जुळून आला, तर दुग्धशर्करा योगावरील वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा होणार हे नक्की. परंतु डाव्या विचारांच्या मुशीत तयार झालेल्या शेकापचे ज्येष्ठ नेते प्रभाकर पाटील यांच्या सूनबाई अलिबाग को-अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील आणि त्यांच्या सुनबाई व पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह व शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील या सासू-सुनांनी आपला वाढदिवस साधेपणानेच नव्हे तर जिल्ह्यातील वाळीत प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांच्या ‘जातपंचायतीला मूठमाती’ या विषयांवरील जाहीर व्याख्यान आयोजित करुन समाजप्रबोधन घडवून आणणारा करायचे योजले.
या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता व्याख्यानाचे आयोजन पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात केले आहे. आपला वाढदिवस साधेपणात साजरा करुन अंधश्रद्धा निर्मूलनाकरिता अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांच्याकडे एक लाख रुपयांची देणगी देखील सुपूर्द करण्यात येईल. सुरूवातीला मुक्ता दाभोलकर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येईल.