Join us  

समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी विशेष उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 5:41 AM

प्रस्तावित असलेल्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे.

मुंबई : प्रस्तावित असलेल्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे विशेष उपाययोजना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची आखणी एकूण तीन अभयारण्यांच्या इकोसेन्सेटिव्ह झोनमधून जात आहे. यात ठाणे जिल्ह्यातील तानसा, वाशिम जिल्ह्यातील कारंजा सोहळ आणि बुलडाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा यांचा समावेश आहे. या अभयारण्यांत अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे.समृद्धी महामार्गाची उभारणी केली जात असताना आणि उभारणीनंतरही येथील वन्यजीवांना महामार्गावरील वाहनांचा त्रास होणार नाही, वनक्षेत्रातील त्यांच्या संचारावर गदा येणार नाही, अशा पद्धतीने महामार्गावर वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी प्रस्तावित संरचनांची उभारणी डेहराडून येथील वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाची मार्गदर्शक तत्त्वे तसेच त्यांच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे. वन्यजीवांना त्यांच्या वावराचे क्षेत्र प्रिय असते. यामध्ये थोडा जरी बदल झाला तरी त्याच्या हालचाली मंदावतात. असे होऊ नये म्हणून समृद्धी महामार्गाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या एमएसआरडीसीने वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाची मदत घेतली.या संस्थेने संपूर्ण महामार्गाचे सर्वेक्षण करून वन्यजीवांच्या मुक्त संचाराकरिता वाइल्डलाइफ अंडरपास वा ओव्हरपास (डब्ल्यूयूपी/ डब्ल्यूओपी) उभारण्याची शिफारस महामंडळाला केली. डब्ल्यूयूपी आणि डब्ल्यूओपी यांची रुंदी किती असावी, लांबी किती असावी, उंची किती असावी याबाबतही या संस्थेने मार्गदर्शन केले. त्यानुसार संरचनांमध्ये बदल करण्यात आले आहेत.भारतात प्रथमच एखाद्या द्रुतगती महामार्गाची उभारणी करताना वन्यजीवांच्या हालचालींवर गदा येणार नाही, याची काळजी घेऊन त्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या संरचनांची बांधणी करण्याचे काम होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.

टॅग्स :समृद्धी महामार्ग