Join us

'रक्षाबंधन'निमित्त एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 13:16 IST

रक्षाबंधन’ सणाला एसटी प्रशासनानं प्रवाशांना खास गिफ्ट दिले आहे.

मुंबई - ‘रक्षाबंधन’ सणाला एसटी प्रशासनानं प्रवाशांना खास गिफ्ट दिले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले असून प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली 25, 26 आणि 27 ऑगस्टला जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. यासाठी एसटी बसस्थानके, बस थांबे येथे वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावे, असे निर्देश परिवहन मंत्री व एसटी मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनास दिले आहेत. त्याबरोबरच प्रवाशी बांधवांनी एसटीरुपी बहिणीला केवळ एसटीतूनच प्रवास करीन असे ओवाळणीरुपी अभिवचन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी प्रवासी वाहतुकीची प्रचंड गर्दी होत असते हे ओळखून एसटीने यंदा आगार पातळीवर मार्गनिहाय जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. सुरक्षित प्रवास वाहतूक करुन प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट एसटी प्रशासनाने ठेवली आहे. त्यासाठी प्रमुख बसस्थानकावर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी प्रवासी मित्र, तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मार्गस्थ निवाऱ्यावर जादा वाहतुकीची माहिती देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी सर्व एसटी कर्मचारी रजा न घेता अहोरात्र काम करुन प्रवाशांना सुरक्षित व वक्तशिर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असतील.