मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या डासांची पैदास टाळण्यासाठी विशेष खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:56 IST2019-05-20T00:55:54+5:302019-05-20T00:56:00+5:30
मार्गिकेत औषध व धुराची फवारणी : एमएमआरसी व महापालिकेत समन्वय

मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या डासांची पैदास टाळण्यासाठी विशेष खबरदारी
मुंबई : मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमानावर मेट्रोची कामे सुरू आहेत. यामध्ये कुलाबा बांद्रा सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या कामालाही वेग आला आहे, मात्र या कामादरम्यान पावसाळ्यात पाणी साचून डासांची उत्पती होऊ नये म्हणून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. या मार्गिकच्या कामांच्या ठिकाणी औषध आणि धूर फवारणी करण्यात येणार आहे.
मेट्रो-३ मार्गिकेच्या बांधकाम स्थळी साठलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी खड्यांमध्ये पाणी साचून त्या ठिकाणी मोठ्या प्रमानावर डासांची पैदास होते. यामुळे विविध साथीच्या आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागते.
हे टाळण्यासाठी एमएमआरसी विशेष खबरदारी घेत असून महापलिकेसोबत समन्वय साधून मेट्रो मार्गिकेच्या २७ स्थानकांसह मार्गिकेवर औषध आणि धूर फवारणी करत आहे. मुंबईतील पूर प्रवण भागात सर्व प्रकारच्या आपत्कालीन उपकरणे आणि वाहने उपस्थित राहतील ज्यामुळे वाहतूक किंवा पाणी तुंबण्यासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाहीत असे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे.
निचरा करण्यासाठी पंप
मेट्रो-३ च्या प्रत्येक स्थानकामध्ये पावसादरम्यान साठणार्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात पंपांची व्यवस्था करण्यात आलेली आहे .मान्सून दरम्यान विद्युतीय व संचार व्यवस्था कायम राखण्यासाठी एमएमआरसी इतर यंत्रणाशी समन्वय साधणार आहे.
च्बांधकाम स्थळावर जमा होणारा मलब्याचा निचरा टारपोलिनने झाकलेल्या डंपर्सद्वारे करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेचे स्थानिक कार्यालय आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी दररोज समन्वय साधला जाईल, मान्सून संबंधी तक्रारी नोंदविण्याकरिता एमएमआरसीच्या संकेतस्थळावर दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करण्यात येईल, असे एमएमआरसीमार्फत स्पष्ट करण्यात आले.