महिलांच्या १०० टक्के मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम
By Admin | Updated: September 15, 2014 01:43 IST2014-09-15T01:43:06+5:302014-09-15T01:43:06+5:30
मुंबई शहरात हजार पुरूषांमागे महिलांचे प्रमाण सरासरी ८३८ इतके आहे.
महिलांच्या १०० टक्के मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम
चेतन ननावरे, मुंबई
मुंबई शहरात हजार पुरूषांमागे महिलांचे प्रमाण सरासरी ८३८ इतके आहे. मात्र त्यातील मतदानास पात्र असलेल्या सरासरी ८१२ महिलांमधील तब्बल ८०१ महिला मतदार नोंदणी करत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक आयोगाने दिली आहे. आता महिलांची मतदार नोंदणीतील सरासरी १०० टक्क्यांपर्यंत नेण्याचे आव्हान पेलण्यासाठी आयोगाने एक विशेष मोहिम आखली आहे.
या मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी माया पाटोळे यांनी सांगितले, ‘महिलांना मतदार नोंदणी आणि प्र्रत्यक्ष मतदान करण्याच्या प्रक्रियेत सामील करून घेण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यात महिलांना मतदार नोंदणी करणे, मतदान करणे, आणि मतदान करताना कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. मोहिम पार पाडण्यासाठी माविमच्या सहयोगिनीपासून महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका अशा विविध प्रशासनामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे.’
जिल्हाधिकारी शैला ए यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माविमच्या सहयोगिनी, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या फेडरेशनच्या अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक नुकतीच पार पडली. त्यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान जनजागृती करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करण्यात आली. शिवाय यादीत नावे नसलेल्या कर्मचाऱ्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले.
आत्ता महिलांसाठी काम करणाऱ्या आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन करत आहेत. त्यासाठी आवश्यक फॉर्म क्रमांक ६ भरण्याची प्रक्रियाही समजावून सांगत आहेत. याशिवाय ज्यांचे नाव मतदार यादीत आहे, त्यांनी मतदान करण्याची जागृतीही या कर्मचाऱ्यांमार्फत सुरू आहे.
या मोहिमेत अधिकाधिक स्त्रियांपर्यंत पोहचण्यासाठी प्रशासनाने मुंबईत काम कार्यरत असलेल्या बचत गटांची मदत घेतली आहे. त्यासाठी बचत गटांच्या फेडरेशनला प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक फेडरेशनमार्फत थेट बचत गट आणि त्यात काम करणाऱ्या महिलांशी संपर्क साधता येत आहे.