संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष
By Admin | Updated: October 14, 2014 22:43 IST2014-10-14T22:43:03+5:302014-10-14T22:43:03+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ऐरोली मतदार संघामध्ये ४ लाख ८ हजार ४३ व बेलापूरमध्ये ३ लाख ८२ हजार १७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ऐरोली मतदार संघामध्ये ४ लाख ८ हजार ४३ व बेलापूरमध्ये ३ लाख ८२ हजार १७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक विभाग संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवणार असून अनेक ठिकाणी व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे.
नवी मुंबईमधील दोन्ही मतदार संघांमध्ये चुरशीची लढत आहे. पहिल्यांदाच या ठिकाणी पंचरंगी लढत होत आहे. मतांचे विभाजन होणार असल्याने सर्वच उमेदवारांसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे झाले आहे. यामुळे प्रचाराची मुदत संपली तरी पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरून जोरदार प्रचार सुरू ठेवला होता. पोलिसांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. निवडणूक विभागानेही पूर्ण तयारी केली आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे पाठविण्यात आली आहेत. प्रत्येक ठिकाणी पुरेसे कर्मचारी देण्यात आले आहेत. सायंकाळपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. ऐरोली मतदार संघामध्ये ३७९ मतदान केंद्रे आहेत. यामधील १७ इमारतींच्या ठिकाणी केंद्रीय सुरक्षा बल तैनात केले आहेत. ३० झोनल आॅफिसर, ४५ सहाय्यक आॅफिसर, १८६५ निवडणूक कर्मचारी तैनात केले आहेत. ही यंत्रणा हाताळण्यासाठी एकूण २०० कर्मचारी कार्यरत आहेत. मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी ६ विभाग कार्यालयांमध्ये सहाय्यता केंद्र. प्रत्येकी एका केंद्रावर किमान ७ कर्मचारी. २० केंद्रांवर व्हिडीओ चित्रीकरण होणार असून ४९ ठिकाणी मायक्रो आॅब्झर्व्हर नेमले आहेत.
बेलापूर मतदार संघामध्ये ३७५ मतदान केंद्रे आहेत. या विभागात संवेदनशील मतदान केंद्र नाही. परंतु गत निवडणुकीमध्ये जेथे अत्यंत कमी मतदान झाले व ज्या केंद्रांवर एकाच उमेदवारास ७५ टक्केपेक्षा जास्त मतदान झाले अशा ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. १७ ठिकाणी मायक्रो आॅब्झर्व्हर ठेवण्यात आले असून निवडणूक शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पूर्ण तयारी केली.