रुग्णालयात कोरोना त्रिसूत्री पालनाकडे विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:11 IST2021-09-02T04:11:45+5:302021-09-02T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत काही दिवसांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र होते. मात्र मागील चार दिवसांपासून पुन्हा ...

रुग्णालयात कोरोना त्रिसूत्री पालनाकडे विशेष लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत काही दिवसांपूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र होते. मात्र मागील चार दिवसांपासून पुन्हा एकदा दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. परिणामी, दुसरीकडे पालिका प्रशासनाने कोविड केंद्र, कोविड काळजी केंद्र आणि पालिका रुग्णालय सज्ज केली असून, या रुग्णालयांतून संसर्ग पसरणार नाही, याचीही दक्षता घेतली जात आहे. शहर उपनगरातील निर्बंध शिथिल केले असले तरीही रुग्णालयाच्या आवारात प्रशासनाकडून कोरोना त्रिसूत्री पालनाकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नायर, केईएम, सायन रुग्णालयात कोरोनाविषयक नियम पडताळणी केली असता, कोविड-नॉन कोविड सेवा राबवीत असताना विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली. मास्कचा वापर, जागोजागी सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर पाळणे यांची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात असल्याचे डॉ. भारमल यांनी नमूद केले.
.....
ओपीडी हाऊसफुल्ल
कोविडचे रुग्ण कमी झाल्यामुळे शिवाय लोकल सेवेची मुभा मिळाल्यामुळे पालिका रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात गर्दी वाढली आहे. कोविडमुळे प्रलंबित असणारे उपचार पूर्ण कऱण्यासाठी मुंबईबाहेरील रुग्णही मुंबईतील रुग्णालयामध्ये येत असतात.
साथीचे रुग्ण वाढले
बदलते वातावरण आणि पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढल्याने रुग्णालयांमध्ये या आजारांकरिता खाटा आरक्षित करण्यात आल्या असून, रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
कोट
खबरदारी आवश्यक
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरीही कोरोना विषाणू गेलेला नाही. शिवाय, दुसरीकडे नॉन-कोविड सेवाही सुरू केल्याने दरम्यान कोविडचा प्रसार वाढणार नाही, याची खबरदारी पालिका प्रशासन घेत आहे. त्यामुळे रुग्णालय हे संसर्गाचे प्रसारक ठरणार नाही, त्यासाठी कठोर उपाययोजना राबविल्या जात आहेत.
- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग