बोलाची कढी़
By Admin | Updated: October 15, 2014 04:53 IST2014-10-15T04:53:33+5:302014-10-15T04:53:33+5:30
दे दान, सुटे गिराण..! वस्त्या, चाळी, गल्लीबोळ, एकत्र कुटुंब, त्यातली माणसं, त्यांचं त्यांच्या त्या सणसोहळ्यांतून जमून, रमून होणारं सादरीकरण

बोलाची कढी़
राजेंद्र शिखरे -
दे दान, आज मतदान!
दे दान, सुटे गिराण..! वस्त्या, चाळी, गल्लीबोळ, एकत्र कुटुंब, त्यातली माणसं, त्यांचं त्यांच्या त्या सणसोहळ्यांतून जमून, रमून होणारं सादरीकरण.. हे सगळंच जसं आटत, थांबत गेलं; तशी ‘दे दान, सुटे गिराण’ ही हटकून कानी पडणारी आणि घर-कुटुंबांकडून कटाक्षानं सांभाळली जाणारी दमदार हाळीही गायब झाली. या संस्कारातच वाढलेली जी काही शिलकीतली दिवस मोजती काढती पिढी आहे, ती चुकूनमाकून कधी कुठं भेटली, तर त्यांनीच जन्माला घातलेल्या त्यांच्या या नव्या पिढीसाठी हळहळते. म्हणते, ‘ग्रहण लागलंय सगळ्या मनुष्य जमातीला. कपडे, खाणं, बोलणं, वागणं, जगणं, जागणं सगळंच बदललंय. जीव गुदमरतोय पण फक्त काळजीपोटीच आम्ही इथं घुटमळतोय. तुमचं दिवस काढणं, दिवस मोजणं बघवत नाही. स्वत:चाच राग येतो. तुमची दया येते. सहसा देव तुम्ही मानत नाही पण दैवाधीन मात्र राहाता. गंडेदोरे, महाराज, बाबाजी, ज्योतिषांचे उंबरे झिजवता. नवसाला पावणाऱ्या मूर्तिकीर्ती मंदिरातून रांगा लावता. किटाळ, कुचंबणा, कटकटी टळाव्यात म्हणून दानधर्म करता. पण जन्मदात्यांना, नातेसंबंधांना घराबाहेर काढता. वाढत्या वयांना वाढत्या खर्चाचं गणित लावता. स्वत:च्याच घरात पेर्इंग गेस्टसारखे राहाता. मिळवती बायको, मिळवता नवरा हाच तुमचा सेट. वेळ काढून जन्माला घातलेल्या पोरांनाही ती स्वत:च्या पायांनी चालापळायला लागल्या लागल्या, नेऊन कुठल्यातरी रियालिटी शोंना विकता. पोरींमध्ये मार्दव नाही. पोरांमध्ये मर्दानगी नाही. सगळी प्रीपेड प्रिप्रोग्रॅम्ड यंत्र. माणसं कमी रोबोट जास्त. भाषा परकी. संस्कार परके. परक्यांत आपलेपणानं रहाणं अवघडून टाकतं आम्हाला! पण पर्याय नाही. कधीतरी जाणीव होईल. उणिवा भरून निघतील या आशेवर आहोत.’
आजच्याच असं म्हणता येणार नाही पण एकूणच आणि किमान आमच्या तरी देशातल्या राजकारणानं आणि ते खेळत्या राजकारण्यांनी, त्यांना निवडून देत्या आम्हा मोठ्या समाजाला असंच अवघडून टाकलेलं आहे. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का.. ना काटता है ना भौंकता है.. सिर्फ सहता है! जिनेकी तमन्ना नही.. मात्र मरने का भय. आगे पिछे उपर निचे.. चारों ओर सिर्फ खौफ चिडचिडाहट. दर्द. मजबुरी. बोझ बनी ज़िंदगी और निभाना! कधीतरी दिवस बदलतील. त्या निळी छत्रीवाल्याला कधीतरी दया येईलच, या आशेवर स्वत:ला ढकलत ठेवणाऱ्यांची आणि अशा अशांत लोकांना निवांतपणे वापरून घेणारांचीच संख्या मोठी. सवय झाली बघता, सहन करताना बहुतेकांना या ओढाताणीची. आता तर याचंच.. आणि हेच राजकारण. त्यात सर्वक्रि याशील राहण्यासाठी निवडणुका. जिता वो सिकंदर. हारा वो भी सिकंदर. बाकी बची जनता, बंदर.
सर्वसामान्य माणसांकडून या देशाचा स्वातंत्र्योत्तर काळ हा, ढोबळ मानानं असाच समोर ठेवला जातो. भारत चंद्रावर गेला. मंगळावर गेलाय पण मग आम्ही जिथले तिथेच सुखेनैव का नांदू शकत नाही? महागाई, अन्याय, अत्याचार, अवहेलना, अशाश्वती ही सगळी आमच्याच वाट्याला का? आमचीच ओढाताण वाढती का? आम्हाला राहायला घर नाही. रस्त्यावर राहू देत नाहीत. खायला अन्न नाही. भीक मागू देत नाहीत. हात आहेत पण हातांना काम नाही.
लोकांना समांतर सरकारं चालवणारी खळ्ळ्खट्याक मांदियाळी नको आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांत रंगणारा दिखाऊ आणि खट्याळ कलगीतुरा तर अजिबात नको आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या, सत्ता-भत्त्यासाठी माजणाऱ्या घोडेबाजारांचा आम्हाला जाम उबग आला आहे. सरकारी प्रशासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींकडून, संगनमतानं होणाऱ्या जनसामान्यांच्या पिळवणुकीनं माणसं कमालीची संतापली, वैतागली आहेत. एकुणात, सध्याच्या भ्रष्टाचारभवनाचं लोककल्याणकारी मंत्रालयात पुनर्परिवर्तन करू धजणारी लोकाभिमुख लोकप्रतिनिधींची फौज निवडण्याच्या कटाक्षानं पछाडलेला ठाम नागरिक, आज, निर्धारानं मतदान करतो आहे. जागते रहो!