बोलाची कढी़
By Admin | Updated: October 7, 2014 23:31 IST2014-10-07T23:31:55+5:302014-10-07T23:31:55+5:30
आये तो वेलकम .. गये तो भीड़ कम! .. छपरावर भगवा गोंदलेला. पुढच्या काचेवर आवाज कुणाचाचं स्टिकर चिकटवलेलं.

बोलाची कढी़
आये तो वेलकम... गये तो भीड़ कम
आये तो वेलकम .. गये तो भीड़ कम! .. छपरावर भगवा गोंदलेला. पुढच्या काचेवर आवाज कुणाचाचं स्टिकर चिकटवलेलं. साइड हुड्सवर ठळक अक्षरात शिवसेना शिवसेना लिहिलेलं. भरधाव वेग. समोर कोणी येवो ना येवो पण कर्कश्य हॉर्न सतत वाजवताच. पांढऱ्या असो वा खाकी युनिफॉर्म मधले असोत; या शायनर रिक्षा आणि रिक्षावाल्यांकडं सहसा पोलिसांचं आणि सामान्य नागरिकांचं दुर्लक्षच. जोश हवा पण होशही हवाच ना! तर .. आये तो वेलकम .. गये तो भीड़ कम .. असं रिक्षावर लिहुन जनतेचं लक्ष वेधण्यामागे संबंधित सेनाभागधारकाचा स्वाभिमान-अभिमान वगैरे दुखावल्याचा संताप आहे, सूडाची भावना आहे, सुटका झाल्याची भावना आहे, वाजवी वा फाजिल आत्मविश्वास आहे का सुवर्णसंधी मिळाल्याचा आनंद आहे, हे केवळ तो रिक्षावाला आणि त्याचा पक्षप्रमुखच जाणे. उद्धव ठाकरे यांच्या सभांना शिवसेनेची सभा म्हणून भरगच्च गर्दी होतेच. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांनाही या दुप्पट तिप्पट आणि उत्स्फूर्त जनसंख्या पहायला मिळायची. पण त्या गर्दीचं निवडणुकीतील प्रत्यक्ष मतात त्यामानानं सहसा परिवर्तन व्हायचं नाही. झालं नाही. राज ठाकरेंसाठीही त्यांच्या सभांची मैदानं तुडंब भरतात. पण परवा परवा राज ठाकरे यांनी स्वत:च त्यांच्या सभेत त्यांच्या समोर पसरलेल्या अथांग जनसमुदायालाच प्रश्न विचारला .. 'एवढी गर्दी होते मग मतं का मिळत नाहीत?'
महाराष्ट्र राज्य भाजपाकडे तर देखणा आणि फर्डा भाषणबाज नाही. मुळात मास अपील असा चेहराच नाही. या पक्षाचे तसे सगळे नेते बहु वाचाळ. दूरचित्रवाहिन्यांवरच्या चर्चा, वृत्तपत्रांसाठीच्या मुलाखती, प्रेस कॉन्फरंस, पक्षाच्या प्रचार सभा, विधानसभा आणि राज्यसभा, की जिथं त्यांना बिनविरोध अधिक बोलू दिलं जातं. ज्याला प्रसिद्धि मिळते, तिथं तिथं यांची जीभ विनाखंड चालते. खरं खोटं जनता ठरवेल पण रेटून बोल हा या पक्षाचा जन्मसिध्द बाणा राहिला आहे. .. आये तो वेलकम .. गये तो भीड़ कम .. हाच भाव भाजपावाल्यांच्या मनीही आहे. पण तो ते जाहीर करणार नाहीत. कळू देणार नाहीत. सेना सैनिकांचं आणि बाळासाहेबांचं तसं नाही. नव्हतं. सगळं रोखठोक. तोंडावर. सडेतोड. चाड राखून काही मिळवण्यासाठी म्हणून बोलणं, हे तर कधीच नाही. म्हणून तर युती टिकली. पंचवीस वर्ष. सेनेला मोठा भाऊ म्हणून सर्व सन्मान मिळाला. तो राखला गेला. सांभाळला गेला. थोरल्या भावाचे आदेश शिरसावंद्य राहिले. त्या आग्रहानं सकल युतिचं सहसा भलंच झालं. पण आधी प्रमोद महाजन मग बाळासाहेब मग गोपिनाथराव मुंडे असे एक एक करत,पक्ष आणि युतिचे घडवते सारथी रथीमहारथी गळत गेले. परिणामी पक्षही खिळखिळायला लागला आणि युतीही सैल होत जात जात सुटली. तुटलीच. काही काही गाठी अशा असतात, की त्या एकदा सुटल्या, की पुन्हा घट्ट बसत नाहीत. सेना भाजपा केंद्रात एकत्र आहेत. मुबई महानगरपालिकेत एकत्र आहेत पण एकजीव नाहीत. परस्परबद्दल संशयात आहेत. अर्थात कार्यकर्त्यांच्या पातळीवर नेहमीच आणि सगळ््याच पक्षात, फायद्याच्या मसुद्यात सामंजस्य आणि आवश्यक संगन्मत असतं. एरवीही सलोखा असतो. कारण कोणतातरी ब्रँडेड पक्ष गाठी पाठीशी असल्याशिवाय राजकारणासाठीच्या समाजकारणात म्हणावा तसा स्कोप मिळत नाही. ही कार्यकर्त्यांची नेत्यांची खरी गोची असते. त्यामुळे या अशा युती-अघाड्यांच्या तुटण्या फुटण्यानं संभ्रमीत होतात, ती सामान्य माणसं आणि त्या त्या पक्षांचे चालक. आत्ताही कदाचित तसंच झालंय. त्यामुळेच पंतप्रधान झालेल्या मोदींना पुन्हा युध्दपातळीवर महाराष्ट्रदेशी प्रचार कार्यात सहभागी व्हावं लागलं आहे. स्वत: मोदींनी बोलून दाखवलं आहे. आपल्या जाहीर सभेत त्यांनी कबूल केलं आहे, की गोपिनाथ मुंडे असते तर त्यांना महाराष्ट्रात सभांसाठी यावंच लागलं नसतं. आलोही नसतो. याचा अर्थ असा, की महाराष्ट्र भाजपाकडे सक्षम नेता नाही. सुज्ञास सांगणे न लगे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असं केवळ जाहिरातीत लिहिण्याने महापुरु षांचे आशिर्वाद मिळत नाहीत का दर भाषणातून आवर्जून शिवबांवर हक्क सांगणाऱ्या कुणाचा, रयतेचा सर्वकल्याणकारी राजा म्हणून स्विकार होत नाही. जाणता मतदार कुणाही नेत्याच्या निव्वळ बोलाच्या कढीला भाळेल असं आता तरी दिसत नाही. नेमकं मतदान होणार आहे. शिवबाचा अखंड महाराष्ट्र जागा रहाणार आहे. जनतेची मानिसकताही अशीच आहे. दुरु स्त आये तो वेलकम .. गये तो भीड़ कम. - राजेंद्र शिखरे