Join us
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण मुंबईला मिळणार नवे मेडिकल कॉलेज; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सोमवारी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 09:18 IST

- संतोष आंधळेमुंबई : गेल्या ११ वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या दक्षिण मुंबईतील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर अंतिम स्वरूप मिळण्याची ...

- संतोष आंधळेमुंबई : गेल्या ११ वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या दक्षिण मुंबईतील नवीन वैद्यकीयमहाविद्यालयाला अखेर अंतिम स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी सोमवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. 

राज्य शासनाचे दक्षिण मुंबईत सर जे.जे.रुग्णालय असून, त्याला संलग्न असे ग्रँट मेडिकल कॉलेज आहे. या रुग्णालयांतर्गत आणखी जी.टी.कामा आणि सेंट जॉर्जेस अशी रुग्णालये आहेत. या तीन रुग्णालयांचे मिळून एका आणखी मेडिकल कॉलेज सुरू व्हावे, यासाठी  गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तसेच ३१ जानेवारी २०१२ रोजी मुंबई शहर परिसरात वैद्यकीय शिक्षण विभागाने नवीन कॉलेज सुरू करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव त्या प्रस्तावाला मान्यता मिळत नव्हती.      

वैद्यकीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी विधानसभा अध्यक्षाच्या दालनात नवीन मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या अनुषंगाने बैठक बोलाविण्यात आली आहे. त्या बैठकीकरिता सामान्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, जे.जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि सार्वजनिक विभागाचे प्रमुख अभियंता यांना बोलाविण्यात आले आहे. या बैठकीत १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला संलग्न ५०० बेड्सचे रुग्णालय कार्यान्वित करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.

राज्यात ६६ वैद्यकीय महाविद्यालये

सध्याच्या घडीला राज्यात एकूण ६६ वैद्यकीय महाविद्यालये असून ८१२० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. त्यामध्ये २५ वैद्यकीय राज्य शासनाची असून त्याची विद्यार्थ्यांची क्षमता ३९५० इतकी आहे. महापालिकेची ५ असून त्याची विद्यार्थ्यांची क्षमता ९०० इतकी आहे. एक वैद्यकीय महाविद्यालयाला शासन अनुदानिक असून त्याची विद्यार्थ्यांची क्षमता १०० इतकी आहे. २२ खासगी महाविद्यालये असून त्याची विद्यार्थ्यांची क्षमता ३१७० इतकी आहे. १३ अभिमत महाविद्यालये असून त्यांची क्षमता २०५० एवढी आहे.

टॅग्स :वैद्यकीयमहाविद्यालयमुंबई