Join us  

प्रेरणास्रोत जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्षाची सांगता; मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 7:11 AM

लोकनायक बापूजी अणे यांच्याकडून ‘लोकमत’चा वारसा घेताना सातत्याने सत्य मांडण्याचा शब्द बापूजींना जवाहरलाल दर्डा यांनी दिला होता.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या धगधगत्या यज्ञकुंडात पूर्ण ताकदीने उतरलेले आणि देश स्वतंत्र झाल्यावर नीती-मूल्यांच्या आधारावर आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजनिर्मितीत अमूल्य योगदान दिलेले जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

सत्यातील सातत्य हेच बाबूजींचे वैशिष्ट्य- सुशीलकुमार शिंदे

लोकनायक बापूजी अणे यांच्याकडून ‘लोकमत’चा वारसा घेताना सातत्याने सत्य मांडण्याचा शब्द बापूजींना जवाहरलाल दर्डा यांनी दिला होता व तो त्यांनी हयातभर पाळला. ‘लोकमत’मध्ये सातत्याने सत्य मांडणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते आणि आजही ते कायम आहे, असे भावोद्गार माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. शिंदे म्हणाले की, बाबूजी हे ध्येयवादी पत्रकार होते. त्यांची ध्येयनिष्ठता ही काँग्रेस पक्षाला वाहिलेली होती. काँग्रेसचा झेंडा त्यांनी कधीही खाली ठेवला नाही. महात्मा गांधींनी दिलेला गरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांच्या भल्याचा विचार त्यांनी शेवटपर्यंत पुढे नेला. विचारांची तीच मालिका विजय आणि राजेंद्र या दोन बंधूंनी कायम ठेवली आहे. सत्ता येते, जाते; पण, ज्या विचारांतून ‘लोकमत’ उभा राहिला त्याला इतिहासात तोड नाही. अनेक वृत्तपत्रे आली, गेली; पण, ‘लोकमत’ टिकला अन् पुढेही टिकेलच. नफा-तोट्याचा विचार न करता राष्ट्रभक्तीचा विचार ‘लोकमत’ने वाढविला. देशाशी प्रतारणा होईल असे एकही वाक्य या वृत्तपत्राने कधी लिहिले नाही आणि लिहिणारही नाही. बाबूजींनी घालून दिलेल्या नीतिधर्मानुसार ‘लोकमत’ वाटचाल करतो आहे याचा विशेष आनंद आहे. बाबूजी हे वसंतराव नाईक यांचे जवळचे मित्र होते. त्यांनी मला नेहमीच मार्गदर्शन केले. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना त्यांनी आमदारांबाबत एक वाक्य उच्चारले. ते काँग्रेसचे अन् आम्हीही. पण, या वाक्यावरून मी विधानसभेत अन् बाबूजींनी विधान परिषदेत भोसलेंविरुद्ध हक्कभंग आणला. सगळ्या आमदारांचा तसा आग्रह होता. आम्ही दोघेही सौम्य. आगाऊ म्हणून आमची कुठेही नोंद नव्हती. पण, मुख्यमंत्र्यांविरोधात बोलावे लागले. पुढे इंदिराजींनी आम्हाला दिल्लीत बोलावून थोडी कानउघाडणी केली; पण, आम्ही सभागृहाची अस्मिता जपली, अशी आठवण त्यांनी सांगितली. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा आणि बाबूजींचा अपार स्नेह होता. संकटाच्या काळात कौटुंबिक जीवनात त्यांनी एकमेकांना नेहमीच साथ दिली, असा आवर्जून उल्लेखही शिंदे यांनी केला. 

राजकारणाची दिशा वळवणे जनतेच्या हाती- पृथ्वीराज चव्हाण

बाबूजींनी स्वातंत्र्यलढ्यात भोगलेला तुरुंगवास, राजकारणातील सक्रियता आणि वृत्तपत्र निर्मिती असे त्यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले. बाबूजींच्या दृढ पक्षनिष्ठेची आठवण त्यांनी सांगितली. ते म्हणाले, १९७८-८० च्या काळात अनेक नेते इंदिराजींची साथ सोडून जात असताना बाबूजी भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. माझ्या मातोश्री महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्ष अन् बाबूजी खजिनदार होते; पण नुसते पदाधिकारी म्हणून नव्हे, तर त्यावेळच्या इंदिरा काँग्रेसचे ते खंदे पाईक आणि आधारस्तंभ होते. बाबूजींचा हसरा चेहरा, आपुलकी मला आजही आठवते. बाबूजी चारवेळा विधान परिषदेचे सदस्य झाले. उद्योगमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय, विदर्भाच्या विकासाचा ध्यास, ऊर्जामंत्री म्हणून दिलेले योगदान, विदर्भात केलेली अनेक प्रकल्पांची मुहूर्तमेढ याविषयी सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी बाबूजींचा राजकारणातील कालखंड उभा केला.

...म्हणूनच लोकमत विश्वासार्हबाबूजींनी सुरू केलेले ‘लोकमत’ दैनिक आज देशातील अग्रणी वृत्तसमूह झाले आहे. मी राजकारणात असलो तरी ‘लोकमत’ने नि:स्पृहपणे काम केले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. दोन्ही बाजूचे लिहा, कोणाला आवडो अगर न आवडो ही त्यांची भूमिका होती. म्हणूनच ‘लोकमत’ची विश्वासार्हता आजही टिकून आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

बाबूजींना अभिमान वाटत असेलडॉ. विजय दर्डा यांच्यासोबत संसदेत काम करण्याची मला संधी मिळाली. अनेक अडचणींच्या प्रसंगांत आम्ही एकत्रितपणे काम केलेले आहे. राजेंद्र दर्डा यांनी  माझ्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री म्हणून उत्तम काम केले. दर्डा कुटुंबाशी माझा जवळचा संबंध आला आहे, बाबूजींनंतर त्यांच्या नवीन पिढीने लोकमत परिवाराचा मोठा विस्तार केला हे पाहून बाबूजींना अभिमान वाटत असेल, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

आजचे राजकारण म्हणजे आयपीएल- अशोक चव्हाण

समाजाभिमुख राजकारण करताना बाबूजी जवाहरलाल दर्डा यांनी सदैव विश्वासार्हता जपली. आजच्या राजकारणाची आणि त्यावेळच्या राजकारणाची तुलना करायची झाली तर त्यावेळचे राजकारण टेस्ट क्रिकेट होते आणि आजचे राजकारण हे आयपीएलसारखे आहे. आज विश्वासार्हता कमी झालेली दिसते. कधी काय होईल, काय घडेल याचा काही नेम नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले. आपले वडील शंकररावजी चव्हाण, त्या आधीचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी बाबूजींच्या असलेल्या अपार स्नेहाचा उल्लेख करून चव्हाण म्हणाले की, राज्य पुढे गेले पाहिजे, हा व्यापक विचार ठेवून बाबूजींनी जी औद्योगिक धोरणे आखली ती आजही महाराष्ट्राला फायदेशीर ठरत आहेत. केवळ मंबई, पुण्याचा विचार न करता अविकसित भागात औद्योगिक विकास झाला पाहिजे, विदर्भ-मराठवाड्यात उद्योग गेले पाहिजेत, रोजगार निर्माण झाला पाहिजे, असा व्यापक विचार बाबूजींनी तेव्हा केला आणि धोरण आखले होते. शरद पवारांनी त्यांच्या या धोरणाचे कौतुक करून बाबूजींची प्रशंसा केली होती. मी स्वत:ला भाग्यशाली मानतो की, मला बाबूजींचा सहवास लाभला. त्यांच्याकडे एक व्यापक दृष्टिकोन होता. बाबूजींनी ‘लोकमत’ नावाचे छोटेसे रोपटे लावले, त्याचा आज वटवृक्ष झालेला आहे. मला अभिनंदन केले पाहिजे राजेंद्र दर्डा  आणि विजय दर्डा यांचे. ते हा वटवृक्ष जोपासत आहेत. इंदिरा गांधींविरोधात त्यावेळी ‘लोकमत’मध्ये बातमी छापून येते, अशी तक्रार त्यांच्याकडे केली गेल्याचा उल्लेख इथे झाला. आजही तेच सुरू आहे. तुमच्या वृत्तपत्राची विश्वासार्हता सांभाळायची असेल, तर जे खरे आहे तेच छापले पाहिजे आणि हे तुम्ही केले आहे. म्हणून तुमच्या वृत्तपत्राची विश्वासार्हता आहे हे नमूद केले पाहिजे. तीच बाबुजींना खरी आदरांजली आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी ‘लोकमत’ समूहाच्या पत्रकारितेचे कौतुक केले. 

जीवनाची प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची असावी- प्रल्हाद वामनराव पै

स्वत:चे हित जपत असताना आपण नेहमी राष्ट्रहित जपणे महत्त्वाचे आहे, असे मत जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’चे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगता समारोहानिमित्त आयोजित ‘जवाहर’ या पुस्तकाच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी प्रल्हाद वामनराव पै बोलत होते. ते म्हणाले, की बाबूजींच्या चरित्र प्रकाशनाला  राजकारणातील लोक हजर राहिले आहेत. मात्र, बाबूजी हे केवळ राजकारणी नाहीत, तर उत्तम समाजसेवकही होते. समाजाची सेवा त्यांनी अधिक केली. बाबूजी आणि सद्गुरू वामनराव पै यांचे जन्म वर्ष एकच होते.  बाबूजी यांचा आज जन्मशताब्दी वर्ष सांगता समारोह होत आहे, तर  सद्गुरू यांचे जन्मशताब्दी वर्ष आता सुरू होणार आहे. बाबूजी आणि सद्गुरू या दोघांनी समाजसेवेचे तसेच समाज घडविण्याचे काम केले आहे आणि आजही आम्ही तेच करत आहोत. राजकारणीदेखील नुसते राज्य चालवीत नाहीत, तर तेदेखील समाजसेवा करतात. आम्ही अध्यात्माच्या माध्यमातून उत्कृष्ट जीवनमूल्य आणि संस्कार देण्याचे काम करतो. आयुष्यात प्रत्येक जण ‘मी’ आणि ‘माझे’ याला महत्त्व देत असतो. मात्र, मी समाजाशिवाय जगू शकत नाही हेदेखील प्रत्येकाला माहीत असले पाहिजे. समाजामुळे आपण आहोत, म्हणून समाजासाठी काही तरी केले पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवावे. संयम आणि सहनशिलता प्रत्येकाने अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे, असेही पै यांनी सांगितले.

स्वत:चे नव्हे, देशहिताचेही बघा आमचे ब्रीदवाक्य आहे की, प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची असावी. त्यामुळे स्वत:चे हित जपताना राष्ट्रहित जपणे महत्त्वाचे असून, किंबहुना प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची असली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बाबूजींची पत्रकारिता निर्भय आणि पवित्र- डॉ. विजय दर्डा

ज्या व्यक्तीकडे काळाच्या पुढे विचार आणि कृती करण्याची क्षमता असते, त्याच व्यक्तीची नोंद इतिहास घेतो. माझे पिता, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी हे द्रष्टे होते. प्रेम आणि क्षमा हे दोन विलक्षण गुण त्यांच्या ठायी होते. पत्रकारिता निर्भय आणि पवित्र असते, ही शिकवण त्यांनी आमच्यावर बिंबवली, असे भावपूर्ण उद्गार लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांनी काढले. बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्ष समारोप समारंभात प्रास्ताविक करताना डॉ. विजय दर्डा यांनी आपल्या कर्तृत्ववान पित्याच्या अनेक आठवणींना आणि आदर्शांना उजाळा दिला. विरोधी राजकीय विचारधारांनाही त्यांनी वृत्तपत्रात स्थान देत नि:पक्ष पत्रकारितेचे महत्त्व आणि स्वातंत्र्य अधोरेखित केले. आमच्या घरात वैभव होते. मात्र बाबूजींनी आम्हा भावांना सरकारी शाळेत घातले. गरीब मुलांच्या घरी ते आम्हांला राहायला लावत. वडीलधाऱ्यांचा सन्मान आणि नम्रता हे गुण बाबूजींनी शिकवले. नमस्कार करण्यात आणि आशीर्वाद घेण्यात काय ताकद आहे, ते त्यांनी शिकवले. त्यांनी कुणाशी वैर बाळगले नाही. राजकीय विरोधकांशीही त्यांची मैत्री होती. बाबूजी निवडणुकीला उभे असताना त्यांच्या विरोधात सभा घेण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी आले होते. त्यांना स्टेशनवर घ्यायला जाणारी गाडी बिघडली तर बाबूजींनी २ गाड्या पाठवल्या. सभेनंतर वाजपेयी घरी येऊन बाबूजींना भेटले. आणीबाणीत जॉर्ज फर्नांडिस दोन दिवस आमच्या घरी राहिले होते. इंदिरा गांधी नाराज झाल्या. मात्र बाबूजींनी इंदिराजींना सांगितले की, जॉर्ज यांचा माझ्यावर विश्वास होता. मला तो विश्वास तोडणे शक्य नव्हते. आम्हा दोन भावांना फक्त दिवाळीत दोन नवे ड्रेस मिळत. रेल्वेने जायचो थ्री टायरने. सामान्य माणसांचे जगणे कसे असते, ते आम्ही शिकावे असे बाबूजींना वाटे. आम्ही एक चांगला माणूस बनावे या दृष्टीनेच त्यांनी आमचे पालनपोषण केले, हे नमूद करताना डॉ. दर्डा यांनी त्याविषयीच्या आठवणी जागविल्या. 

टॅग्स :जवाहरलाल दर्डाअशोक चव्हाणसुशीलकुमार शिंदेविजय दर्डालोकमत