Join us  

यंदाच्या दिवाळीत फटाक्यांचा आवाज खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2020 2:23 AM

ध्वनिप्रदूषण झाले कमी : प्रशासनाच्या आवाहनाला मुंबईकरांचा सकारात्मक प्रतिसाद

n  लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महापालिका आणि सरकारने केलेल्या सूचनांचे पालन करून मुंबईकरांनी दिवाळीदरम्यान कमीत कमी फटाके फोडण्यावर भर दिला. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत ध्वनिप्रदूषण बऱ्याच प्रमाणात कमी झाले असून वायुप्रदूषण रोखण्यातही यश आले.

मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरात फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे वायुप्रदूषणात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली असली तरी ती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. वांद्रे, खार दांडा, सांताक्रुझ, विलेपार्ले, माहीम, दादर, मरिन ड्राइव्ह आणि वरळी सीफेस या परिसरांचा यात समावेश आहे. शिवाय दिवाळीत झालेल्या वायुप्रदूषणाच्या तुलनेत उर्वरित दिवसांत होणारे वायुप्रदूषण अधिक असल्याची नाेंद झाली आहे. यास येथील वाहने, कारखाने, रस्ते, धूळ, धूर आणि धुरके कारणीभूत आहे.

यंदा मुंबईकरांनी नवा आदर्श घालून दिला आहे. कमी फटाके फोडत ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी केले आहे. गेल्या कित्येक वर्षांतील दिवाळीशी तुलना करता यावर्षी दिवाळीत वायुप्रदूषण कमी झाले आहे. मात्र असे असले तरी मुंबईकरांनी आणखी सहकार्य करत प्रदूषणावर मात केली पाहिजे, असे मत आवाज फाउंडेशनने व्यक्त केले.

उपाययाेजनांची गरजआवाज फाउंडेशनने सिटीजन सायन्स प्रोजेक्टअंतर्गत दिवाळीतील वायुप्रदूषणाची नोंद केली आहे. दिवाळीदरम्यान बहुतांश ठिकाणांवरील आवाजाची पातळी मोजण्यात आली. जेथे कमी फटाके फोडण्यात आले तेथे कमी आणि जेथे अधिक फटाके फोडण्यात आले तेथे जास्त वायुप्रदूषणाची नोंद झाली. परिणामी संपूर्ण मुंबईचे प्रदूषण मोजण्याऐवजी प्रत्येक ठिकाणी प्रदूषणाची नोंद घेऊन त्यानुसार उपाययाेजना केल्यास भविष्यात प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.- सुमैरा अब्दुलाली, आवाज फाउंडेशन

वायुप्रदूषण पार्टिक्युलेट मॅटर (५० पेक्षा कमी म्हणजे हवा समाधानकारक)

n खारदांडा - ७५, सांताक्रुझ - ८८, विलेपार्ले - १७३, माहीम - १५३, दादर - २५१, वांद्रे - ७५, मरिन ड्राइव्ह - १२७, वरळी - १०३

टॅग्स :फटाके