मुंबई- विमानाच्या स्वच्छतागृहात सिगारेट ओढणाऱ्या दोन प्रवाशांविरोधात सहार पोलिसांनी विमान वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही पंजाबच्या अमृतसर परिसरातील रहिवासी असून, कमलजीत सिंग (३८) आणि कोमलजीत सिंग (३०) अशी या दोघांची नावे आहेत.
इंडिगो एअरलाइन्सच्या दुबई ते मुंबई या विमानात हे दोघे २० एप्रिल रोजी प्रवास करत होते. विमान सुरू होण्याआधी धूम्रपान बंदीची सूचना दिल्यानंतर एका प्रवाशाने ‘फ्लाइट पर स्मोक कर सकते है क्या’ अशी विचारणा केली. त्यावर असे करणाऱ्यावर कारवाई होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले. मुंबई विमानतळावर विमान पोहोचायला तासभर बाकी असताना टॉयलेटमधून सिगारेटच्या धुराचा वास येऊ लागला. केबिन क्रू मेंबर प्रवीणावल्ली मनोरंजन (३५) यांनी टॉयलेटचा दरवाजा उघडला असता आत धूर भरला होता.
सिगारेट होती, पण लायटर गायब?विमानाचे कप्तान जयकृष्ण नायर (५१) यांच्यासमोर कमलजीत आणि कोमलजीत यांनी टॉयलेटमध्ये सिगारेट प्यायल्याची कबुली दिली. त्यानुसार विमानतळावर उतरताच या प्रवाशांकडून सिगारेटचे पाकीट ताब्यात घेण्यात आले. मात्र, लायटर किंवा माचिस त्यांच्याकडे सापडली नाही. त्यामुळे विमानात सोबत असलेल्या अन्य साथीदारांकडे ते दिले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सहार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अधिक तपास सुरू केला.
सॉरी फिरसे नही होगाप्रवाशाने कबुली देताना वहाँ पे लिखा था, यहाँ पे स्मोक अलाउड है इसलिये मैने स्मोक किया, असे स्पष्टीकरण दिले. त्याचदरम्यान दुसऱ्या प्रवाशानेही तेथे जाऊन धूम्रपान केले. त्याला जाब विचारल्यावर ‘सॉरी फिरसे नहीं होगा’ असे उत्तर देण्यात आले.