वाहतूक नियमनाची अंमलबजावणी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:12 IST2021-09-02T04:12:57+5:302021-09-02T04:12:57+5:30
मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामध्ये जीवितहानी होते. रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यात वाहतूक नियमनाची ...

वाहतूक नियमनाची अंमलबजावणी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल : मुख्यमंत्री
मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामध्ये जीवितहानी होते. रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यात वाहतूक नियमनाची अंमलबजावणी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपयुक्त ठरेल, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा ७८ वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमएमआरडीए मैदान, वांद्रे कुर्ला संकुल येथे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना महामारीमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले, त्याप्रमाणे रस्त्यांवरील वेगवान धावणाऱ्या वाहनांच्या अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या हजारात आहे. भरधाव वेगाने वाहने चालवू नयेत असे आवाहन करूनही नियमांचे पालन न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. यावर आळा घालण्यासाठी अद्ययावत यंत्रसामग्रीने सुसज्ज वाहने दाखल झाली आहेत. रस्ते अपघातात कारण नसताना उगाचच वेगापायी वाहनचालक आणि सोबतींचेही प्राण जातात. ही प्राणहानी व्हायला नको. परिवहन विभागाच्या वायुवेग पथकाला अधिक सक्षम करण्यासाठी शासन नेहमीच सहकार्य करेल, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
परब म्हणाले की, राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वायुवेग पथकांना अत्याधुनिक यंत्र सामग्रीने सुसज्ज असलेली ७६ वाहने उपलब्ध केली आहेत. या वाहनांच्या माध्यमातून अपघातांचे प्रमाण आणि बेशिस्त वाहतूक नियंत्रणात येईल. तसेच अपघाताच्या प्रमाणाबाबतीत राज्याचे स्थान खाली आणण्यासाठीही वाहनांचा उपयोग होईल, असेही परब यांनी सांगितले.
कशी आहेत अत्याधुनिक वाहने
राज्यामध्ये वाहन तपासणीसाठी परिवहन विभागाची एकूण ९२ वायुवेग पथके आहेत. राज्य रस्ता सुरक्षा निधीतून महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ एस ५ या मॉडेलची ७६ वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांमध्ये रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी स्पीड गन, ब्रेथ ॲनालायझर, व टिंट मीटर उपकरणे, इंटिग्रेटेड कॅमेरे बसविण्यात आले आहेत.