सोनसाखळी चोरांची दहशत
By Admin | Updated: May 8, 2015 23:18 IST2015-05-08T23:18:10+5:302015-05-08T23:18:10+5:30
शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी दिवसभरामध्ये तीन महिलांच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावण्यात आले

सोनसाखळी चोरांची दहशत
नवी मुंबई : शहरात सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी दिवसभरामध्ये तीन महिलांच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने हिसकावण्यात आले. रोज होणाऱ्या या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी मुंबई पोलिसांसमोर सोनसाखळी चोरांनी आव्हान उभे केले आहे. पोलीस बंदोबस्त, नाकाबंदी व शहरात सीसी टीव्ही कॅमेरे बसविल्यानंतरही रोज ३ ते ४ ठिकाणी दागिने हिसकावण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी पहाटेपासून पुढील चोवीस तासांमध्ये तब्बल ८ महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी हिसकावले होते. एका ठिकाणी महिलेस मारहाण करण्यात आली होती. सोनसाखळी चोरीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी कोपरखैरणे सेक्टर-१० मध्ये राहणाऱ्या कल्पना गेमवेकर या त्या राहत असलेल्या सोसायटीजवळून पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गळ्यातील ३७ हजार ५०० रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे. खारघर सेक्टर-१२ मध्ये राहणारे समीत शिंदे हे शिवमंदिर रोडने पायी जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली.
ऐरोली सेक्टर-२ मधील नारायणी सोसायटीत राहणाऱ्या मुक्ता पाबरेकर या गुरुवारी सायंकाळी ७ वाजता राहत्या घराचा दरवाजा उघडत होत्या. अनोळखी व्यक्तीने मागून त्यांना आवाज दिला. त्या पाठीमागे वळताच संबंधित व्यक्तीने गळ्यातील ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली आहे. आतापर्यंत रोडवरून पायी जात असताना महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावले जात होते. आता चोरटे घरापर्यंत पाठलाग करून दागिने हिसकावू लागले आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांसमोरही चोरट्यांचे आव्हान उभे राहिले आहे. शहरात बंदोबस्ताची मागणीही आता नागरिक करू लागले आहेत. (प्रतिनिधी)