Join us

पोलीस कारवाईदरम्यान आमची माणसं गायब झाली; आंदोलक कर्मचाऱ्यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 09:08 IST

आमची माणसं कुठे गोली, ती कुठे आहेत, ते आम्हाला कळायला हवं; एसटी कर्मचारी आक्रमक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला. जवळपास १५० ते २०० कर्मचारी पवारांच्या घराजवळ पोहोचले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना आंदोलकांनी खळबळजनक दावा केला आहे. 

पोलिसांनी प्रचंड बंदोबस्तात आम्हाला मध्यरात्री आझाद मैदानातून हुसकावून लावलं. आम्हाला सीएसएमटी स्थानकात सोडण्यात आलं पोलिसी कारवाईदरम्यान अनेक कर्मचारी जखमी झाले. तर काही कर्मचारी गायब झाले. आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र त्यांना फोनही लागत नाहीत. आमचे सहकारी कुठे गेले, त्यांना कुठे ठेवण्यात आलं आहे, असे प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केले. आमचे सहकारी परत येत नाहीत, तोपर्यंत आम्ही सीएसएमटी सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

आम्ही गेल्या ५ महिन्यांपासून आझाद मैदानात शांततेत आंदोलन करत होतो. मात्र आता आम्हाला अचानक तिथून हाकलवून लावण्यात आले. आझाद मैदानात वीज, पाण्याची सुविधा नाही. कडक पोलीस बंदोबस्तात आम्हाला सीएसएमटी स्थानकात आणण्यात आलं. एक तर पोलिसांनी आम्हाला पुन्हा आझाद मैदानात सोडावं, अन्यथा आम्ही सीएसएमटी स्थानकातच ठिय्या देऊ, असा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. आमचे काही सहकारी गायब झालेत. ते कुठे आहेत याचं उत्तर आम्हाला मिळायला हवं, असं कर्मचारी म्हणाले.

आझाद मैदानातील आंदोलकांना हुसकावलंआझाद मैदान येथील आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी मध्यरात्री  कारवाई करत त्यांना बाहेर काढलं असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी स्थानकात घोषणाबाजी सुरू केली आहे. विलीनीकरणाच्या मुद्यावरून गेल्या पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदान येथे आंदोलन सुरू होतं.

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन केल्यानंतर  मुंबई पोलिसांनी एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदान रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी बाहेर निघण्यास नकार दिला होता. वकील गुणरत्न सदावर्ते सांगतील तोपर्यंत आम्ही बाहेर जाणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र मध्यरात्री पोलिसांनी कारवाई करत २५० कर्मचाऱ्यांना बाहेर काढले असून यामधील ५ कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आझाद मैदानातून बाहेर काढल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात बसून ठिय्या देण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :एसटी संपशरद पवार