मनसेचे काही दिग्गज डेंजरझोनमध्ये....!
By Admin | Updated: October 4, 2014 22:55 IST2014-10-04T22:55:39+5:302014-10-04T22:55:39+5:30
सुपरवोट....

मनसेचे काही दिग्गज डेंजरझोनमध्ये....!
स परवोट............................................................मनसेचे काही दिग्गज डेंजरझोनमध्ये....!मुंबई: गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे आणि नाशिक भागात मनसेचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. मराठी बहुल भागात मराठी भाषेच्या मुद्यावर मनसेचे आमदार निवडून गेले. मात्र गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. मनसेची हवा आता राहिली नाही, आणि नाविन्यही आता उरलेले नाही. माझ्या हाती एकदा सत्ता द्या, बघा काय करून दाखवतो, या आवाहनावरही आता नाशिकमधील मनसेच्या कामगिरीमुळे लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत. यामुळेच मनसेचे मुंबई आणि नाशिकमधील काही दिग्गज उमेदवार डेंजरझोनमध्ये आहेत.दादर, शिवडी, विक्र ोळी, भांडूप, मागाठणे, घाटकोपर येथे मनसेचे आमदार आहेत. शिवडीमधून बाळा नांदगावकर विजयाची शाश्वती नसल्याने उभे राहणार नाहीत, असे वाटत असताना अखेरच्या क्षणाला त्यांना पक्षाने उमेदवारी घ्यायला लावली. दादरमधून स्वत: राज उभे राहिले असते, तरच तिथे मनसेला हमखास विजयाची आशा ठेवता आली असती, आता नितीन सरदेसाईंसमोर शिवसेनेचे मोठे आव्हान आहे. शिवसेनेला लोकसभेला येथे मोठी आघाडी मिळालेली आहे. शिशिर शिंदे गेली दोन वर्षे मनसेमध्ये फार सक्रिय नाहीत, त्यामुळे भांडूपमध्ये विजयाची खात्री देता येत नाही. मुंबईमध्ये बदललेली राजकीय परिस्थिती पाहता नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे हे मनसेचे दिग्गज नेते डेंजरझोनमध्ये आले आहेत. त्यामुळे राज्यभर राज यांच्या साथीला अत्यंत कमी वेळात प्रचाराकरिता कोण फिरणार हा यक्षप्रश्न आता मनसेसमोर उभा राहिला आहे. मनसेचे सर्व नेते आता यातून कसा मार्ग काढतात यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहील असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)