तुमचे प्रश्न सोडवू, संप करू नका - विनोद तावडे
By Admin | Updated: May 6, 2015 02:23 IST2015-05-06T02:20:11+5:302015-05-06T02:23:14+5:30
राज्यातील शासकीय, जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी दोन तासांचा संप पुकारला होता. सायंकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परिचारिकांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली.

तुमचे प्रश्न सोडवू, संप करू नका - विनोद तावडे
मुंबई : परिचारिकांना न मिळणारी वेतनवाढ, विविध न मिळणारे भत्ते, सुट्या, गणवेश, परिचारिकांसाठी वसतिगृह, परिचारिकांसाठीच्या रिक्त जागा भरणे इत्यादी मागण्यांसाठी राज्यातील शासकीय, जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी दोन तासांचा संप पुकारला होता. सायंकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परिचारिकांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. संप करू नका, तुमचे प्रश्न सोडवू, असे आश्वासन तावडे यांनी परिचारिकांना दिले.
राज्यातील १८ हजार परिचारिकांनी सकाळी साडेसात ते साडेनऊ काम बंद केले होते. यानंतर सर्व परिचारिका पुन्हा कामावर रूजू झाल्या. दुपारी साडेतीननंतर परिचारिकांनी नर्सिंगचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी एक तास चर्चा केली. यानंतर मंत्रालयात तावडे यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान परिचारिकांनी प्रमुख प्रश्न तावडे यांच्यासमोर मांडले. यामध्ये जनरल नर्सिंग अॅण्ड मॅटर्निटी (जीएनएम) हा नर्सिंगचा २००८ साली बंद केलेला अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावा, असे सांगितले. यावर तावडे यांनी सकारात्मक उत्तर दिले. या विषयाचा आढावा घेऊन पुन्हा एकदा जीएनएम अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन तावडे यांनी दिले असल्याची माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सिंग फेडरेशनच्या सरचिटणीस कमल वायकोळ यांनी दिली.
परिचारिकांना गणवेशासाठी २००७ सालापासून भत्ता मिळालेला नाही. कामा, सेंट जॉर्ज आणि जी.टी. रुग्णालयातील परिचारिकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळत नाही, यावर अभ्यास करून तोडगा काढू. गणवेशाचा भत्ता मिळेल, थकबाकीही देऊ, असे आश्वासन दिले.