धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवा

By Admin | Updated: August 27, 2014 00:40 IST2014-08-27T00:40:55+5:302014-08-27T00:40:55+5:30

तुर्भे येथे घराचे प्लास्टर कोसळून तरुण मृत झाल्याच्या घटनेचे पडसाद मंगळवारी महासभेत उमटले. सिडकोनिर्मित जुन्या इमारतींमध्ये प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडत असतानाही एफएसआयचा प्रश्न निकाली लागत नाही

Solve the problems of dangerous buildings | धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवा

धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवा

नवी मुंबई : तुर्भे येथे घराचे प्लास्टर कोसळून तरुण मृत झाल्याच्या घटनेचे पडसाद मंगळवारी महासभेत उमटले. सिडकोनिर्मित जुन्या इमारतींमध्ये प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडत असतानाही एफएसआयचा प्रश्न निकाली लागत नाही. त्यामुळे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून निर्णय निकाली काढण्याची तयारी चर्चेदरम्यान दर्शवली.
शहरातील जुन्या इमारतींमध्ये प्लास्टर कोसळण्याच्या घटना सातत्याने घडतच आहेत. अशातच २१ आॅगस्ट रोजी प्लास्टर कोसळून अक्षय शिंदे या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तुर्भे येथे घडली. या घटनेच्या अनुषंगाने भाजपा पक्षप्रतोद विजया घरत यांनी मंगळवारी महासभेत लक्षवेधी मांडली. एफएसआयचा निर्णय होण्यास शासन स्तरावर विलंब होत आहे. त्यामुळे हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धडक देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यावेळी नगरसेवक भरत नखाते यांनीही तुर्भे येथील दुर्घटनेच्या अनुषंगाने नगरविकास खात्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली. शहरातील सर्वच जुन्या घरांची दुरवस्था झालेली असून प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरजही नखाते यांनी व्यक्त केली. नगरसेवक नामदेव भगत यांनी मात्र शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता सध्याही नागरिक दीड एफएसआयचा वापर करुन घरांची पुनर्बांधणी करू शकत असल्याचे सभागृहात सांगितले. तसेच इमारती धोकादायक असतानाही नागरिकांना तेथे राहण्याची परवानगी कशी दिली जाते. तसेच या नागरिकांना ट्रँझिट कॅम्पमध्ये स्थलांतरित का करण्यात आले नाही. त्यामुळे महापालिकेवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे असेही भगत म्हणाले. तर खाजगी इमारतीमध्ये दुर्घटना घडल्यास संबंधित विकासकावर देखील गुन्हा दाखल व्हावा असेही त्यांनी सुचवले. याप्रसंगी नगरसेवक शिवराम पाटील यांनी सीआरझेड क्षेत्रामधील सुमारे ४०० इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. या इमारतींना अद्याप भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले नसताही तेथे रहिवाशी राहत आहेत. त्यामुळे अशा उंच इमारतींमध्ये दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार राहणार असा प्रश्नही त्यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी शासन एफएसआयचा निर्णय घेत नाही हे नवी मुंबईचे दुर्भाग्य असल्याची खंत महापौर सागर नाईक यांनी व्यक्त केली. त्यानुसार आज लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहात झालेल्या चर्चेचे इतिवृत्त मुख्यमंत्र्यांकडे पाठवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Solve the problems of dangerous buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.