वर्सोव्यातील सर्व प्रश्न मार्गी लावणार- मुख्यमंत्री
By Admin | Updated: December 26, 2016 23:11 IST2016-12-26T23:11:10+5:302016-12-26T23:11:10+5:30
वर्सोव्यातील सर्व प्रश्न मार्गी लावणार असे ठोस आश्वासन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा येथील नागरिकांना आणि येथील कोळी बांधवांना दिले.

वर्सोव्यातील सर्व प्रश्न मार्गी लावणार- मुख्यमंत्री
मनोहर कुंभेजकर/ ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - वर्सोव्यातील सर्व प्रश्न मार्गी लावणार असे ठोस आश्वासन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा येथील नागरिकांना आणि येथील कोळी बांधवांना दिले.वर्सोवा विधानसभेच्या भाजपाच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी सलग दुसऱ्या वर्षी येथील लोखंडवाला म्हाडा कॉलनीनजिक वर्सोवा महोत्सवाचे आयोजन केले होते.या महोत्सवाचे शानदार उद्घाटन आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर,शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे,ममुंबई भाजपा अध्यक्ष अँड.आशिष शेलार,आमदार व उत्तर पश्चिम मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष अमित साटम,मुंबई भाजपा महिला अध्यक्षा शलाका साळवी,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मोहित कुंभोज,शिवसंग्रामचे मुंबई अध्यक्ष दिलीप माने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात सुरवातीला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सलग दुसऱ्या वर्षी वर्सोवा महोत्सवाचे शानदार आयोजन करून आमदार डॉ.लव्हेकर यांनी वर्सोव्याची नवीन ओळख करून दिली आहे.सात बेटापासून मुंबई बनली,त्यातील वेसावे हे एक पुरातन बेट असून मुंबईची खरी प्राचीन संस्कृती वेसावकरांनी आज जिवंत ठेवली आहे.आमदार डॉ.लव्हेकर यांच्या सततच्या मागणी प्रमाणे वर्सोवा येथील चार पुलांचा प्रश्न,अंधेरी क्रीडा संकुलातील नियोजित नाट्यगृह,विकास आराखड्यात वेसावा कोळीवाडा निर्देशित करणे,कोळीवाड्यांच्या घरांवर होणारी कारवाई थांबवणे आदी साठी त्यांनी सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा केला.तसेच वेसावे समुद्रातील गाळ काढण्यासाठी ३८ कोटी रूपये शासनाने मंजूर केले असून मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडून लवकर मंजुरी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच गाळ काढ्ण्यासाठी केंद्रीय नोकानयन मंत्री नितीन गडकरी सहकार्य करणार असून ड्रेजिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियाकडून गाळ काढण्याची हमी त्यांनी दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन.जागतिक कीर्तीचे कलाकार वर्सोव्याने दिले.डॉ.लव्हेकर यांच्या मागणी नुसार वर्सोव्यात बॉलीवूड हबसाठी आपण प्रयत्न करणार असून लवकरच बैठक घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.तसेच शासकीय जमिनीवरील घरबांधणी समस्या दूर झाली असून मुंबईकरांसाठी एक लाख घरे बांधण्यासाठी सरकार कटीबद्ध असून मुंबईकरांसाठी नुकतेच पंतप्रधांनांनी भूमीपूजन केलेल्या प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा चेहरामोहरा बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वर्सोवा येथील नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्न करून आणि विधानसभेत आवाज उठवणाऱ्या आपण एका कार्यतत्पर आमदार डॉ.लव्हेकर यांना निवडून दिल्याबद्धल त्यांनी वर्सोवा येथील नागरिकांचे आभार मानले.
आज वर्सोव्यात नवरत्नांची खाण पाहायला मिळते.आज या महोत्सवात वर्सोवा भूषण म्हणून गौरवलेले पद्मभूषण प्रसिद्ध पार्श्वगायक उदीत नारायण हे वर्सोव्याचे रहिवासी असल्यामुळे हा सत्कार मोठा आहे.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रसिद्ध पार्श्वगायिका सपना अवस्थी,गेली ७० आठवडे वर्सोवा समुद्र किनारा दर शनिवार आणि रविवार स्वच्छ करणारे आणि युनायटेड नेशनने गौरवलेले आफ्रोझ शहा,सीटी इंटरनँशनल शाळेचे चेअरमन मोलिक दिक्षीत,वर्सोवा आर्य समाजाचे आर्या हरिष,प्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड,अभिनेत्री रागिणी खन्ना आदी मान्यवरांचा यावेळी मुख्यमंत्र्यांनी शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव केला.यावेळी आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्या कार्यअहवालाचे देखिल मुख्यमंत्र्यांनी प्रकाशन केले.
प्रारंभी आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी गेली २०वर्षे रखडलेला वर्सोव्याचा विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीमुळे आणि त्यांच्या बहुमोल सहकार्यामुळे मार्गी लागणार आहे .या मतदार संघातील कोळीवाड्यातील घरांना संरक्षण देऊन ती अधोरीखीत करा,वसावे समुद्रातील ५५ लाख क्युबिक मीटर गाळ काढणे,वेर्सोव्यातील रखडलेले पूल लवकर बांधणे,वेसावे येथे जेट्टी बांधणे,याठिकाणी अडकलेले एसआरए प्रकल्प मार्गी लवकर मार्गी लावणे,वर्सोवा येथे बॉलीवूड हब उभारणे आदी समस्यांचा उहापोह त्यांनी करून त्या लवकर सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती त्यांनी केली.
यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर,विनायक मेटे यांची भाषणे झाली.तर उदीत नारायण आणि सपना अवस्थी यांनी आपल्या गाजलेल्या काव्यपंक्ती सादर केल्या.