निसटत्या विजयाने दिग्गजांनाही फोडला घाम

By Admin | Updated: October 20, 2014 02:41 IST2014-10-20T02:41:38+5:302014-10-20T02:41:38+5:30

महायुती आणि आघाडीत झालेल्या बिघाडीमुळे मुंबईतील ३६ ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पाच प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

Soldiers beat bouts of grief | निसटत्या विजयाने दिग्गजांनाही फोडला घाम

निसटत्या विजयाने दिग्गजांनाही फोडला घाम

मुंबई : महायुती आणि आघाडीत झालेल्या बिघाडीमुळे मुंबईतील ३६ ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पाच प्रमुख पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील बहुतेक लढती एकतर्फी झाल्या असल्या, तरी ४ ठिकाणी झालेल्या चुरशींच्या लढतींमध्ये उमेदवारांना निसटता विजय मिळवण्यात यश आले आहे.
मुंबईतील भायखळा, वडाळा, अणुशक्तीनगर आणि कलिना या चार मतदारसंघांत अगदी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. केवळ दीड हजाराहून कमी मताधिक्याने येथील उमेदवारांना विजय मिळवता आला आहे. या चारही मतदारसंघांत भायखळा मतदारसंघातील लढत सर्वांत चुरशीची ठरली. येथील पहिल्या चार उमेदवारांमधील मतांची तफावत ५ हजारांहून कमी आहे. आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या ओवेसी बंधूंच्या पक्षाने मुंबईतले खाते याच मतदारसंघात उघडले आहे. एआयएमआयएमचे विजयी उमेदवार वारिस पठाण यांनी २५ हजार ३१४ मते मिळवत या ठिकाणी यश मिळवले; तर २३ हजार ९५७ मते मिळवलेल्या भाजपाच्या मधू चव्हाण यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
कलिना मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेमध्ये अटीतटीची लढत झाली. या ठिकाणी शिवसेनेच्या संजय पोतनीस यांनी भाजपाच्या अमरजित सिंग यांच्यावर केवळ १ हजार २९७ मतांनी मात केली. तर अणुशक्तीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना शिवसेनेच्या तुकाराम काते यांच्याकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.
या ठिकाणी मलिक यांना केवळ १ हजार ७ मतांनी पराभव पत्करावा लागला. सर्वांत कमी मतांनी विजय मिळवणारा उमेदवार वडाळा मतदारसंघातील आहे. येथून सलग सहा टर्म आमदार म्हणून निवडून आलेल्या कालिदास कोळंबकर यांनाही यंदा चांगलाच घाम गाळावा लागला. भाजपाच्या मिहिर कोटेचा यांच्याहून केवळ ८०० मते अधिक मिळवत, त्यांनी आपली आमदारकी शाबूत राखली आहे. परिणामी चुरशीच्या ठरलेल्या या लढतींत समर्थकांचा जीव गळ्यापर्यंत आणला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Soldiers beat bouts of grief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.