सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरण , ५५ साक्षीदार फितूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:10 AM2018-05-13T05:10:07+5:302018-05-13T05:10:07+5:30
सोहराबुद्दिन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी सरकारी वकिलांनी आतापर्यंत ८० साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविली.
मुंबई : सोहराबुद्दिन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणी सरकारी वकिलांनी आतापर्यंत ८० साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविली. पैकी ५५ साक्षीदार फितूर झाले. शुक्रवारच्या सुनावणीतही दोन साक्षीदार फितूर झाले. राजस्थानचे पोलीस उपअधीक्षक हिंमत सिंह आणि पोलीस हवालदार कांती लाल यांचा यात समावेश आहे.
हिंमत सिंह यांना शुक्रवारी विशेष सीबीआय न्यायालयात सरकारी वकिलांचे साक्षीदार म्हणून उपस्थित करण्यात आले. मात्र, साक्ष देताना ते अत्यंत भावुक झाले. ‘सीबीआयने मला साक्ष देण्यासाठी बोलावले, तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात जमिनीवरच बसविले. त्यांनी मला धमकावले. मी त्यांच्या म्हणण्यानुसार साक्ष दिली नाही, तर या केसमध्ये मलाही गोवण्यात येईल, अशी धमकी त्यांनी दिल्यावर मी सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत साक्ष नोंदविली,’ असे हिंमत सिंह यांनी न्यायालयाला सांगितले. २५ डिसेंबर २००६ रोजी दिनेश एम. एन. यांनी एएसआय नारायण सिंग याला न्यायालयात हजर करण्याचा आदेश दिला. नारायण सिंग याच्याबरोबर पोलीस हवालदार दलपत सिंह, युधवीर सिंह आणि कर्तार सिंह होते. त्या वेळी हिंमत सिंह याने दिनेश एम. एन. यांना या चार पोलिसांना आरोपींबरोबर न पाठविण्याची विनंती केली. कारण हे चारही पोलीस विशेष पथकाअंतर्गत काम करत होते. मात्र दिनेश एम.एन. यांनी हिंमत सिंह यांचे म्हणणे मानले नाही. उलट हे चार जण आरोपीला न्यायालयात उपस्थित करण्यासाठी जाणार आहेत, याची नोंद न करण्याचा आदेश हिंमत सिंह यांना दिले.
ही तीच वेळ होती, जेव्हा पोलिसांनी तुलसीराम प्रजापती पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्याची बोंब केली. वास्तविकता पोलिसांनी त्याची बनावट चकमक करून हत्या केली, असा दावा सीबीआयने केला आहे.