मुंबई : सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमकप्रकरणी डिसेंबरमध्ये सुटका केलेल्या ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या सुटकेला आव्हान देण्याची परवानगी या प्रकरणातील एका साक्षीदाराला देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तुलसीराम प्रजापती याचा कारागृहातील सहकैदी महेंद्रसिन्हा जाला याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. इंद्रजीत महंती व न्या. ए.एम. बदर यांनी त्याच्या याचिकेवर सोमवारी निकाल दिला.जाला याच्या म्हणण्यानुसार, तो या प्रकरणात ‘पीडित’ आहे. त्यामुळे त्याला या पोलिसांच्या सुटकेला आव्हान देण्याचा अधिकार आहे.सोहराबुद्दीनप्रमाणे माझीही बनावट चकमकीत हत्या करण्यात येईल, असे मला धमकविण्यात आले व मला माझा जीव वाचवायचा असल्यास १५ लाख रुपये दे, असे डी. जी. वंजाराने धमकाविले, असेही जाला याने याचिकेत म्हटले आहे. मात्र, या घटनेमुळे जालाचे वैयक्तिक नुकसान झाले नाही. जाला या प्रकरणातील पीडित नाही. त्यामुळे ३८ अधिकाऱ्यांच्या सुटकेविरोधात त्याला अपील करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने जालाचा अर्ज फेटाळला.
सोहराबुद्दीन कथित बनावट चकमक प्रकरण: पोलिसांच्या सुटकेला आव्हान देण्यासंदर्भातील अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 05:24 IST