'सोहम' घडवणार श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंचे दर्शन

By संजय घावरे | Published: November 7, 2023 08:41 PM2023-11-07T20:41:12+5:302023-11-07T20:41:20+5:30

वासुदेव कामत यांचे आध्यात्म आणि कलेचा संगम घडवणारे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू

'Soham' will show the aspects of Lord Krishna's personality | 'सोहम' घडवणार श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंचे दर्शन

'सोहम' घडवणार श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंचे दर्शन

मुंबई - नेहमीच आपल्या अनोख्या चित्रांनी कलाप्रेमींना मोहित करणारे ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांनी आध्यात्म आणि कलेचा संगम घडवत 'सोहम' या संकल्पनेतून रेखाटलेल्या श्रीकृष्णाच्या चित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू झाले आहे. १३ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन गुलबर्ग्याचे प्रसिद्ध शिल्पकार मनैया बडीगेर यांच्या हस्ते करण्यात आले.

दीपप्रज्वलनाने 'सोहम'चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बडीगेर यांच्यासोबत आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष विजय आचरेकर, पुण्याचे आर्ट डिझायनर सुहास एकबोटे, सर जे जे स्कूल ऑफ आर्टसचे डीन विश्वनाथ साबळे, चित्रकार भगवान रामपुरे आदी मंडळी उपस्थित होती. या प्रदर्शनात एकूण ३० चित्रे मांडण्यात आली आहेत. 'सोहम'च्या संकल्पनेबाबत कामत म्हणाले की, आजवर अनेकांनी कृष्णावर चित्रे काढली असली तरी हा विषय संपणारा नाही. कृष्णचरित्रावर चित्र काढण्याऐवजी 'सोहम'द्वारे कृष्णावर लक्ष केंद्रित करत त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंद्वारे कॅनव्हासवर रेखाटले आहे. या श्रृंखलेतील एकही चित्र यापूर्वी कोणीही काढलेले नाही. माझ्या कल्पनेतून काही विषय ठरवून ही चित्रे रेखाटली आहेत. कृष्ण हे व्यक्तिमत्त्व चित्रांद्वारे सादर करण्याचा प्रयत्न आहे. यात कृष्णाचे बालपण, तरुणपण, अखेरचा क्षण, दैनंदिन जीवनातील क्षण रेखाटले आहेत; परंतु यातून कोणताही प्रसंग न दाखवता त्याचे व्यक्तिमत्त्व दाखवले आहे. आपली झोप गाढ असते, पण कृष्णाची योगनिद्रा असते. योगनिद्रेतील त्याची झोप हुकूमी असली तरी तो कायम जागा असतो. फक्त शरीराला आराम असतो. चैतन्य मात्र सतत प्रज्वलित असते. त्यामुळे चित्रात सुदर्शन चक्र दाखवले आहे.

'तो' मीच आहे...
रामाचे प्रवचन, पूजन जिथे सुरू असते तिथे मारुतीराया उपस्थित असतो हे आपण ऐकले आहे. रामनाम सुरू असते तिथे तो आकर्षित होतो. कृष्णासमोर आल्यानंतर मी इकडे कसा आकर्षित झालो? असे मारुतीरायाला वाटते. तिथे दोघांची नजरानजर झाल्यानंतर हनुमंताच्या मनातील साशंकता दूर करण्यासाठी कृष्ण देवघरातून श्रीरामाची मूर्ती आणतो आणि त्याला मोरपीस लावून दाखवतो की तो मीच आहे.

वाचन आणि श्रवण
सोहम ही संकल्पना वाचन आाणि श्रवण या दोन्हींमधून सुचलेली आहे. काही वेळा कल्पना जन्म घेते आणि एखादे अनोखे चित्र साकारते. अशा विविध बाजूंनी डेव्हलप होऊन सोहमची निर्मिती झाली आहे.

Web Title: 'Soham' will show the aspects of Lord Krishna's personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.